वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार सकारात्मक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 07:54 PM2021-02-15T19:54:10+5:302021-02-15T19:54:28+5:30
वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख
मुंबई : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात आज वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमाग धारकांच्या विविध संघटनांनी शेख यांची आज भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन आदी उपस्थित होते.
या बैठकीत सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालास मान्यता देणे, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी 10 टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरातील सूट तसेच वीज बीलात सवलत, अतिरिक्त जमीनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांना एकरकमी तडजोड (वन टाईम सेटलमेंट योजना) सुरु राबविणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
अस्लम शेख म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्री महोदयांकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान तसेच अतिरिक्त जमिन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यड्रावकर म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्जासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्य शासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे प्रतिनिधींचा समावेश असावा. यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक भाग्यश्री बातायत, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, ए.बी. चालुक्य , इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन सतीश कोष्टी, खासगी यंत्रमाग संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, विजय निमते आदी मान्यवर उपस्थित होते.