- संतोष आंधळेमुंबई : गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवून मदत करावी, असे आवाहन करणाऱ्या क्राउड फंडिंग वेबसाइट्सच्या कार्यपद्धतीतील अनियमतितेची चौकशी करून त्यासाठी नियमावली तयार करण्यासाठी समिती नेमणार असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. क्राउड फंडिंगच्या या वेबसाइट्सच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारा उजेडात आणले होते. ‘लोकमत’शी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, क्राउड फंडिंगच्या वेबसाइट्सवर सध्या आरोग्य विभागाचे कोणतेही बंधन नाही किंवा त्याकरिता नियमावलीही अस्तित्वात नाही. कारण हा विषय आरोग्य व्यवस्थेशी निगडित आहे. साध्या उपचारासाठी भरमसाठ बिलाचे अंदाजपत्रक रुग्णालय देत आहे. कुणी बिलाच्या अंदाजपत्रकात खाडाखोड करून मदतीचे कॅम्पेन राबवित आहे. राज्याचा गृह विभाग, विधी व न्याय विभाग यांच्याशी चर्चा करून क्राउड फंडिंग वेबसाइट्सवरील या सर्व अनियमिततेची चौकशी करून नियमावली तयार करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे. रुग्णांची व्यथा ऐकून-वाचून अनेक जण मदत जमा करतात. त्यांचा या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला तर याचा फटका गरीब रुग्णांना बसेल, असेही ते म्हणाले.
n क्राउड फंडिंगच्या वेबसाइट्सचा लाभ गरजू रुग्णांना होतो ही चांगली गोष्ट आहे. मात्र, मदतीची ही प्रक्रिया राबवित असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी सगळ्यांनीच घ्यायला हवी. त्यासाठी नियमावलीची गरज आहे.n गेल्या काही वर्षांपासून क्राउड फंडिंग वेबसाइट्सचे पेव फुटले आहे. हजारो नागरिक या माध्यमातून त्यांच्या आजारपणाच्या उपचारासाठीचा लागणार निधी उभारत असतात.n यामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळतो. तसेच अनेक रुग्णांच्या नातेवाइकांसाठी आजाराच्या उपचारांसाठी पैसे उभारण्याचे हे हक्काचे स्थान झाले आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.