Join us

'हे' सरकार रामन राघवसारखे; राज ठाकरेंच्या उल्लेखाने मुंबईकरांना आठवली १९६० 'ती' काळरात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 9:23 AM

१९६५ ते १९६८ च्या काळात रमन राघवने जवळपास ४० पेक्षा अधिक हत्या केल्या.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी प्रभादेवी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत आरेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. रातोरात मेट्रो कारशेडसाठी आरेतील २७०० झाडांची कत्तल करण्यात आली. मी व्यंगचित्रकार असल्याने काही घटनांचा एकमेकांशी संबंध लगेच आठवतो. आरेतील झाडांच्या कत्तलीने हे सरकार रामन राघवसारखं वागतंय अशा शब्दात राज यांनी सरकारला लक्ष्य केलं. 

राज ठाकरेंनी भाषणात रामन राघवचा उल्लेख झाल्याने मुंबईकरांना १९६० च्या दशकातील ती दहशत पुन्हा नजरेसमोर आली. मुंबई शहरातील त्या काळोख्या रात्री अनेकांना मृत्यूचे खेळ पाहिले. रात्रीच्या अंधारात अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले होते. ३ वर्षात ४० पेक्षा अधिक जणांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या कोण करतंय? कशासाठी करतंय? याबाबत मुंबई पोलिसही चिंताग्रस्त झाली होती. फूटपाथवर झोपलेल्या माणसांची हत्या होत होती. पुरुष, महिला, लहान मुले हा हल्लेखोर कोणालाच सोडत नव्हता. 

१९६० च्या दशकातील मुंबईची काळरात्र मुंबईकरांसाठी भयानक होती. रात्रीच्या वेळी लोकांच्या हत्या होत होत्या. या हत्येमागे कोण आहे याचा तपास मुंबई पोलीस करत होती. एकापाठोपाठ असा हत्या झाल्याने संपूर्ण मुंबई शहरात खळबळ माजली होती. खून्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र एक केली. संध्याकाळ होताच रमन राघवच्या दहशतीने मुंबईचे रस्ते ओस पडत होते. रामन राघव याचा शिकार रस्त्यावर झोपलेले भिकारी, मजूर होते. तो कधी, कुठून आणि कसा यायचा याचा थांगपत्ता कोणालाच लागत नव्हता. 

१९६५ ते १९६८ च्या काळात रमन राघवने जवळपास ४० पेक्षा अधिक हत्या केल्या. २७ ऑगस्टला पोलिसांनी रमन राघवला अटक केली. सुरुवातीच्या तपासाच्या काळात रमन राघवने कोणत्याही प्रश्नाला उत्तरं दिली नाही. रामन राघवने या हत्या करण्यामागे कोणतंही ठोस कारण नव्हतं. मानसिक संतुलन बिघडल्याने रामनने या हत्या केल्याचं निष्पन्न झालं. अटकेनंतर त्याने पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात अनेक लपविलेली हत्यारं दाखविली. ही सगळी हत्यारं पोलिसांकडून जप्त करण्यात आली. रमन राघवला हायकोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा दिली. १९९५ मध्ये पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये किडनीच्या आजाराने त्याचा मृत्यू झाला.      

टॅग्स :राज ठाकरेमुंबईपोलिस