मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगून सत्तेत आला आहात, पण शिवाजी महाराजांचे मावळे आज उपोषण करीत आहेत. त्यांना ४० दिवसांपासून न्याय मिळाला नाही. त्यामुळे मराठा समाज टोकाची भूमिका घेईल. सर्व संघटना रस्त्यावर उतरतील. मराठा आंदोलन पेटल्यास सरकार जबाबदार राहील, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
मराठा समाजाला महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२ मधील कलम १८ अन्वये काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून २०१४ सालच्या भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. दरेकर म्हणाले की, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत ४० दिवसांपासून सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. या तरुणांनी ४० वर्षे बसायचे का? चर्चा बैठकांवरचा विश्वास उडाला आहे़ काही आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तरीही सरकार जागे झाले नाही़ त्यांना मराठा तरुणाचा बळी हवा आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.सरकारची उदासीनताजेव्हा एखाद्या सरकारच्या मनात एखादी गोष्ट करायची असते, त्या वेळी ते स्वत: लक्ष घालून काम करतात; पण या प्रकरणात सरकारची उदासीनता दिसून येते. सरकार फक्त मराठा समाजाला काम केल्यासारखे दाखविते, पण काम करीत नाहीत. ते मराठा समाजाने ओळखले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखविण्याशिवाय सरकारला पर्याय नाही, असे आमदार राहुल नार्वेकर यांनी सांगितले.सरकार असंवेदनशीलदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात कोठेही आरक्षणाबाबत आंदोलन, उपोषण सुरू असले, तर दुसऱ्या दिवशी मंत्रालय, वर्षा बंगल्यावर बैठका झाल्या आहेत. सगळ्यांना भेटून चर्चा करीत होते.४० दिवस काय तर चार दिवसही कोठे लागले नाहीत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.