पुन्हा निकालात गोंधळ झाल्यास सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:59 AM2017-10-05T02:59:19+5:302017-10-05T02:59:37+5:30
मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबई: मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही आता नोव्हेंबर महिन्यात होणा-या परीक्षांच्या उत्तरपत्रिकाही आॅनलाईन तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला माझा विरोध आहे. तसेच, या निकालामध्ये पुन्हा गोंधळ झाल्यास त्याला राज्यपाल आणि राज्य सरकार जबाबदार राहील अशी टीका मुंबई माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर यांनी केली. तसेच, डॉ. संजय देशमुख यांच्यावर अजूनही कारवाई का केली जात नाही? असा सवाल मुणगेकर यांनी उपस्थित केला आहे.
बुधवारी मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. बुधवारी मुणगेकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा देशमुख यांच्यावर निशाणा साधला. विद्यापीठाने ४७७ निकाल जाहीर केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात अजूनही ११ हजार विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. १ हजार ६०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. पण, हे गुण देणार म्हणजे काय? या विषयी स्पष्टता नाही. त्यामुळे अजूनही गोंधळ सुरुच आहे. या सर्व प्रकाराला डॉ. संजय देशमुख जबाबदार असल्याची टीका केली.
विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याची टीका करताना त्यांनी पुन्हा एकदा संजय देशमुख यांना धारेवर धरले. त्यांच्यावर विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (१४) (९) कलमानुसार कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत ही मुणगेकरांनी यावेळी व्यक्त केले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला विरोध नाही. ती काळाची गरज आहे. पण ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे उत्तरपत्रिका तपासणीत इतका गोंधळ झाला त्याच कंपनीमार्फत पुढील पेपर तपासणीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेणे चुकीचा आहे. कंपनीला १० उपाय विद्यापीठाने सुचवल्याचे सांगण्यात आले. पण, यात नक्की काय उपाय सुचवले हे विद्यापीठाने जाहीर करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.