"महागाई, चलनवाढीची झळ सामान्यांना बसणार नाही याची सरकारकडून खबरदारी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 05:39 AM2023-05-30T05:39:29+5:302023-05-30T05:40:39+5:30
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जनसंपर्क अभियानात ग्वाही
मुंबई : महागाई, चलनवाढीची झळ सामान्यांना बसणार नाही याची खबरदारी केंद्र सरकार घेत असून त्यावर सरकारची बारीक नजर आहे आणि गरज भासेल तेथे आम्ही हस्तक्षेपही करत राहू, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी येथे पत्र परिषदेत दिली.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या उपलब्धींची माहिती देण्यासाठी भाजपने देशव्यापी जनसंपर्क अभियान हाती घेतले असून त्याचा महाराष्ट्रातील प्रारंभ म्हणून सीतारामन यांची पत्रपरिषद झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आदी उपस्थित होते. महागाईवर केंद्र सरकारचे नियंत्रण नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा समाचार घेताना सीतारामन म्हणाल्या की, जनसामान्यांशी संबंधित वस्तूंचे दर नियंत्रणात राहतील यावर सरकारचे लक्ष आहे. त्यात अन्नधान्य, फळे व भाज्यांचा समावेश आहे. किरकोळ चलनवाढ ४.८ टक्क्यांवर आली आहे. घाऊक चलनवाढ उणेच्या जवळ आहे.
संपादकांशी केली चर्चा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी रात्री मुंबईत विविध प्रसार माध्यमांच्या संपादकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उपस्थित होते.
माजी अर्थमंत्र्यांनी भान ठेवावे
बरीच वर्षे देशाचे अर्थमंत्रिपद भूषविलेल्या व्यक्तीने असे म्हणणे योग्य नाही. देशाच्या चलनाविषयी आपण बोलत आहोत, याचे भान असायला हवे. दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्राचा नाही, तर रिझर्व्ह बँकेचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री