मुंबई : राजभवन येथे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चौदा मजली इमारती बांधण्यात आल्या आहेत. या अंतर्गत ६३ घरे बांधण्यात आली आहेत. २६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शासकीय कर्मचाऱ्यांना या घरांचे वितरण होणार आहे. राजभवनातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पूर्वी १० बाय १० आकाराच्या खोल्या असलेल्या चाळींमध्ये राहत होते. शंभर वर्षांहून अधिक काळ जुन्या असलेल्या या सर्व मोडकळीस चाळी पाडून कर्मचाऱ्यांसाठी एकच बहुमजली इमारत बांधावी व प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ३५० चौरस फुटांचे घरे द्यावे, अशी सूचना तत्कालीन राज्यपाल दिवंगत मोहम्मद फजल यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना केली होती. त्यानुसार १७ जुलै २००४ रोजी फजल व शिंदे यांनी राजभवनातील पहिल्या बहुमजली इमारतीचे भूमिपूजन केले होते. इमारतीच्या ए विंगचे बांधकाम २०११ साली पूर्ण झाले. १० मे २०११ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते बहुमजली इमारतीच्या ए विंगचे उद्घाटन झाले होते. त्या इमारतीमध्ये ६८ कर्मचारी राहत आहेत. आता इमारतीच्या बी विंगचे उद्घाटन होणार आहे. बहुमजली इमारतीच्या दोन्ही विंग पूर्ण झाल्यामुळे एकूण १३१ कर्मचारी या वसाहतीत राहणार आहेत. या इमारतीचा स्थापत्य व विद्युत कामावरील एकूण खर्च १९.१५ कोटी इतका झाला. बहुमजली इमारतीमध्ये एकूण ६३ निवासस्थाने आहेत. पहिल्या ते नवव्या मजल्यांवर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरिता १ बेडरूम असलेली ३६० चौरस फूट क्षेत्रफळ आकाराची ४३ निवासस्थाने आहेत. तर दहाव्या मजल्यापासून चौदाव्या मजल्यापर्यंत तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी २ व १ बेडरूम असलेली प्रत्येकी ४९० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली २० निवासस्थाने आहेत. (प्रतिनिधी)
शासकीय कर्मचाऱ्यांना राजभवनात मिळणार ६३ घरे!
By admin | Published: May 23, 2015 1:39 AM