Join us

सरकारने आता म्युकरमायकोसिसवर लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:06 AM

उच्च न्यायालयाचे मतसरकारने आता म्युकरमायकोसिसवर लक्ष द्यावेउच्च न्यायालयाचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या ऑक्सिजन ...

उच्च न्यायालयाचे मत

सरकारने आता म्युकरमायकोसिसवर लक्ष द्यावे

उच्च न्यायालयाचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सध्या ऑक्सिजन पुरवठा, खाटांची उपलब्धतता, रेमडेसिविर औषधाचा पुरवठा या समस्या राहिल्या नाहीत. सध्या तरी या गोष्टी पुरेशा प्रमाणात उपलब्धता आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) व त्याच्याशी संबंधित मुद्यांवर लक्ष द्यावे. त्यावरील औषध पुरवठ्यावर लक्ष द्यावे, असे मत उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले.

रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठा, अपुऱ्या खाटा व कोरोनासंबंधितील अन्य समस्यांबाबत उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.

कोरोनापाठोपाठ काळ्या बुरशीचा आजार राज्यात वेगाने पसरतोय. अहमदनगरमध्ये गेल्या तीन दिवसांत ९९२८ नव्या काळ्या बुरशीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलेही या आजाराने ग्रस्त आहेत, अशी माहिती एका याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली.

* औषधाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न

म्युकरमायकोसिसवर दिवसाला औषधांचे सहा डोस देणे गरजेचे असताना पुण्यात रुग्णांना केवळ एकच डोस मिळत आहे, असेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर राज्य सरकारच्यावतीने महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले की, देशपातळीवरच या औषधाचा तुटवडा आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार काळ्या बुरशीवरील औषध ‘अँपोटोरेसिन-बी’ चे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आम्ही आधीच प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पुढील सुनावणीत याबाबत उत्तर देऊ, असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले.

..............................