Join us

सरकारने गोविंदा पथकांवर विश्वास ठेवून दहीहंडीबाबत पुनर्विचार करावा - बाळा पडेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदाही दहीहंडी उत्सवावर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गोविंदा पथकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने यंदाही दहीहंडी उत्सवावर बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गोविंदा पथकांचा मात्र हिरमोड झाला आहे. सरकारने इतर सर्व उत्सवांवर ज्याप्रमाणे नियम व अटींची बंधने घातली आहेत तशाच निर्बंधांमध्ये आम्हाला पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करू द्या, अशी गोविंदा पथकांची मागणी आहे. सरकारने आम्हाला विचारात न घेताच एकतर्फी निर्णय घेतला असल्याचे दहीहंडी समन्वय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारने एकदा गोविंदा पथकांवर विश्वास ठेवून त्यांना पारंपरिक पद्धतीने तरी दहीहंडी साजरी करू द्यावी व आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे मत दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी वक्त केले आहे.

सरकारच्या दहीहंडीबाबतच्या निर्णयाबद्दल काय वाटते?

- सरकारने निर्णय घेण्याअगोदरच आम्ही सरकारला पत्रव्यवहार केला होता. नेहमी ज्या मोठ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो तो न करता काही नियम व अटी घालून साजरा करण्याची परवानगी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न होता. उत्सवाची परंपरा जपली जावी यासाठी निमित्त म्हणून पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्यायला हवी होती. सरकारने गोविंदा पथकांवर विश्वास ठेवायला हवा. सर्वात जास्त तरुणांचा समावेश असणारा खेळ दहीहंडी आहे. उद्या हेच तरुण सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी पुढे येतील. सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे.

पारंपरिक पद्धतीने दहीहंडी म्हणजे नेमके कसे?

उत्सवाची परंपरा जपली जावी यासाठी गोविंदा पथक ज्या मैदानात सराव करतात किंवा दहीहंडीच्या दिवशी मंडळाची मानाची हंडी फोडण्यास परवानगी मिळायला हवी होती. वेळेच्या बंधनात १८ वर्षांवरील लसीकरण झालेल्या कमी मुलांच्या उपस्थितीत हा सण साजरा केला जाऊ शकतो. यामुळे कोणताच गोविंदा रस्त्यावर उतरला नसता, त्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला नसता व पोलिसांवरील ताण कमी झाला असता.

गोविंदांचे याबाबत काय म्हणणे आहे?

- कोरोना आटोक्यात येऊन सर्व काही सुरू झाले आहे. त्यामुळे सर्व गोविंदा पथक आपापल्या चाळीत अथवा परिसरात साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याची मागणी करत आहेत. प्रत्येक सणाला नियम व अटी घालून दिल्या आहेत, तशाच अटी दहीहंडी सणाला घालून द्याव्यात. मात्र सणावर सरसकट बंदी घातल्याने सर्व गोविंदांमध्ये नाराजी आहे. या सणावर अशीच बंदी येत राहिली तर कालांतराने मागे वळून पाहिल्यावर दहीहंडी हा सणच नव्हता असे एखाद्याला वाटू शकते, अशी चर्चा गोविंदांमध्ये आहे.

संकटकाळात दहीहंडी मंडळांनी कशाप्रकारे मदत केली?

कोरोनाच्या काळात व पूरपरिस्थितीत मदतीला धावणारे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव मंडळांचेच कार्यकर्ते होते. आजही समाजोपयोगी उपक्रम सुरूच आहेत. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर आरोग्य उत्सव साजरा करण्यात आला. या वर्षीही सर्व मंडळ आरोग्य उत्सव साजरा करणार.

सरकारला काय सांगावेसे वाटेल?

- सरकारच प्रत्येक गोष्टीवर विचार करू शकते आणि ठरवू शकते. नागरिक विचार करू शकतच नाही, असे सरकारला वाटत आहे. त्यांनी नागरिकांचेदेखील ऐकायला हवे. सण साजरा करण्याची परवानगी दिल्यास नागरिकांमध्येदेखील चांगली भावना निर्माण होऊन ते जबाबदारीने वागतील. ज्या ठिकाणी कमी वेळेत पारंपरिकरीत्या दहीहंडी साजरी होईल, अशा ठिकाणी माणुसकीच्या नात्याने त्यांच्यावर कारवाई करू नये. सर्व गोविंदांचे समाधान होईल व पोलीसमित्र हे नाव अधिक ठळक होईल.