Join us

सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी

By admin | Published: July 01, 2015 10:43 PM

पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी जमीन नाही, तर आपली जीवन पध्दती देत आहेत. त्यांचे होणारे नुकसान पैशाने भरुन काढता येणार नाही,

अलिबाग : पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकरी जमीन नाही, तर आपली जीवन पध्दती देत आहेत. त्यांचे होणारे नुकसान पैशाने भरुन काढता येणार नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा न करता त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पेण बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्त समितीने बुधवारी जिल्हाधिकारी शीतल उगले यांची भेट घेतली. बाळगंगा प्रकल्पासाठी देण्यात येणारा मोबदला हा नवीन भूसंपादन कायद्या नुसार द्यावा, सध्या सुरु असलेली पुनर्वसनाची प्रक्रिया ही धीम्या गतीने सुरु आहे. शेतकऱ्यांना साडे बावीस टक्के विकसित भूखंड देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वाणिज्य उद्देशासाठी वापरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना ते मोफत मिळावे, यासह अन्य मागण्या आमदार धैर्यशील पाटील यांनी जिल्हाधिकारी शीतल उगले यांच्यापुढे मांडल्या. खासगी संस्थेमार्फत चुकीच्या पध्दतीने संयुक्त मोजणी झाली असल्याने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात तफावत असल्याकडे गागादे खुर्दचे सरपंच शिवाजी पाटील यांनी उगले यांचे लक्ष वेधले. संयुक्त मोजणी पुन्हा करता येते का याची मी चौकशी करते, मोबदला देण्याचा निर्णय हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याबाबत मला काही बोलता येणार नाही. वरिष्ठांशी बोलून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, त्यानंतर पुन्हा १५ दिवसांनी बैठक बोलावून आढावा घेण्यात येईल असेही उगले यांनी शेतकऱ्यांना सांगितले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी जयमाला मुरुडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)