मराठीतून वैद्यकीय शिक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शासनाने नीट अभ्यास करावा!
By मनोहर कुंभेजकर | Published: October 29, 2022 03:01 PM2022-10-29T15:01:43+5:302022-10-29T15:02:10+5:30
माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई- केंद्रीय धोरणा नुसार मराठीतून वैद्यकीय विविध अभ्यासक्रम शिकविले जाणार याची तयारी राज्यशासन करीत असल्याची अशी घोषणा केली. याबाबतीत काही मूलभूत अडचणी आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. इंग्लिश या भाषेची आकलनासाठी अडचण होत आहे का ? त्यामुळे आपल्या वैद्यकीय विद्यार्थ्याला परिक्षा पास होणे कठीण जात आहे कां? त्याचे उत्तर विद्यार्थी व प्रोफेसर देऊ शकतील , म्हणून त्याचा कल घेणे आवश्यक आहे .त्यामुळे राज्य शासनाने नीट अभ्यास करावा अशी मागणी राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केली आहे.
कालच्या 'लोकमत'च्या अंकात आता मराठीतून व्हा डॉक्टर! या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे आपली भूमिका विषद केली. वैद्यकीय प्रवेश परिक्षा मराठी सह इतर ८ भाषातून घेण्याचा निर्णय झाला, याला कोर्टाने ही मान्यता दिली. पण इंग्लिश व्यतिरिक्त मराठी,हिंदी उर्दु,उडीया,बंगाली, कन्नड, तामीळ तेलुगू या भाषेतून परिक्षा पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थी वर्गाची संख्या किती आहे ? यांत आता आणखी पाच भाषांतील विद्यार्थी २०२१पासून अधिकचे होतील . २०२२ मधे देशात १८.७ लाख विद्यार्थी नीट परिक्षेला बसले होते .त्यापैकी १,३७४९२ विद्यार्थी विविध भाषेतून म्हणजे प्रादेशिक भाषेतून परिक्षा देतील. २०२१ च्या तुलनेत ही संख्या वाढली आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडिकल स्कूल किंवा कॅालेज मध्ये वैद्यकीय भाषा ही इंग्लिशच प्राधान्याने मान्यता प्राप्त आहे. लेबनॅानने तर लेबनीज भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्यास सुरूवात केली होती .मात्र हेल्थ केअर मधे मेडिकल टर्मिनॅालॅाजीला पर्याय नाही.महाराष्ट्रात मात्र २०२२ मधे २३६८ विद्यार्थी मराठीतून नीट परिक्षा दिली, तर गुजराथीतून ४९००० हिंदीतून ४२००० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. आपण कितीही म्हटले तरी संपूर्ण अभ्यासक्रम मराठीत भाषांतरीत करणे हे एक दिव्यच आहे. त्या मेडिकल टर्मिनॅालाजीचा पर्याय उपलब्ध करून नव्याने पुस्तके उपलब्ध करणे कठीण आहे. शिवाय पोस्ट ग्रॅज्युएशन साठी , पुढील शिक्षणासाठी परदेशात इंग्लिश शिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्रात असेही मराठीतून नीट परिक्षा देणारे २६०० विद्यार्थी होते. अनेक इंग्लिश मधील शब्द जसेच्या तसे वापरावे लागतील उदा व्हेंटिलेटर सक्शन ,अनेक आजाराची नावे ,ती त्याच स्वरूपात लोकाना समजतात मात्र डॅाक्टर -पेशन्ट याच्यातील संवाद प्रादेशिक भाषेत असावा,आणि या सर्वातून नेमके काय साध्य होणार ? असा सवाल त्यांनी केला.