Join us

परीक्षेदरम्यान संसर्ग झाल्यास सरकारने जबाबदारी घ्यायला हवी, पालक संघटनांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 5:24 AM

परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याला संसर्ग झाल्यास, तो संक्रमित होऊन घरच्यांना झाल्यास त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (राष्ट्रीय पात्रता परिषद) च्या ३ जुलैच्या परिपत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा १ ते ६ सप्टेंबर रोजी तर नीट यूजी परीक्षा १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार असल्याचे सोमवारी निश्चित झाले. सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, विद्यार्थी आणि पालक संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याला संसर्ग झाल्यास, तो संक्रमित होऊन घरच्यांना झाल्यास त्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.दरवर्षी २५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी जेईई व नीट परीक्षा देतात. त्यामुळे सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास आरोग्य सुरक्षा पुरवण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पालकांनी वर्तविली आहे. यासाठी जेईई व नीट या परीक्षा रद्द करण्याऐवजी ती पुढे ढकलावी. परीक्षा डिसेंबरमध्ये घ्यावी, अशी मागणी इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशन या पालक संघटनेकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व केंद्र सरकारला पत्राद्वारे केली. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर परीक्षा होणार हे निश्चित झाले आहे.नीट आणि जेईच्या २०२० परीक्षा आयोजित करण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागेल.विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोफत वाहतुकीची सुविधा हवी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची दक्षता घेऊन परीक्षा केंद्रावर सर्व प्रकारच्या मुबलक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी केली. तसेच विद्यार्थी व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर त्यांच्या उपचाराची सर्व जबाबदारी राज्य सरकार घेईल व जीवितहानी झाल्यास केंद्र सरकार जबाबदार राहील, अशी प्रतिक्रियी त्यांनी दिली.>‘सुरक्षेसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे’विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांवर आसन व्यवस्था कशी असणार? फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी काय नियोजन असणार? एखाद्या विद्यार्थ्याला संसर्ग झालाच तर त्याची जबाबदारी कोण घेणार, अशा विविध प्रश्नांचे आयोजकांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे.