आग घटनेनंतरही सरकार झोपेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:05 AM2021-04-05T04:05:42+5:302021-04-05T04:05:42+5:30
मुंबई : रविवारी दहिसरच्या कोविड सेंटरला आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; पण या झोपलेल्या सरकारला कधी जाग ...
मुंबई : रविवारी दहिसरच्या कोविड सेंटरला आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; पण या झोपलेल्या सरकारला कधी जाग येईल आणि आरोग्य व्यवस्थेला कधी सुरक्षितता प्राप्त होईल, असा सवाल विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, वेळीच फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सरकार काय करीत आहे, हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. कोविड सेंटरच नाही तर सर्व रुग्णालयांमधील अग्नी सुरक्षा व्यवस्था व त्याबाबतचे योग्य नियोजन व्हावे, आवश्यकता असल्यास एक विशेष स्कॉड नेमावा, अशी सूचनाही दरेकर यांनी केली.
भंडारा जिल्हा रुग्णालय अग्नितांडवात १० निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तरी सरकारचे डोळे उघडतील आणि राज्यातील सर्व रुग्णालयांच्या सुरक्षिततेबाबत सरकारकडून तातडीने उपाययोजना होतील, असे वाटले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच भांडुपच्या सनराईज हॉस्पिटलला आग लागली, त्यातही नऊ रुग्णांचा मृत्यू झाला होता, अशाच अनेक आगीच्या घटना एकामागून एक घडत असून, निष्पाप लोकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.