सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 06:41 IST2025-03-12T06:40:00+5:302025-03-12T06:41:32+5:30

अर्थसंकल्पवरील चर्चेत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Government stopped the schemes introduced by Eknath Shinde when he was the Chief Minister Opposition alleges | सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही

सरकारने शेतकरी, बहिणींना फसवले, शिंदेंच्या काळातील योजना केल्या बंद; 'आनंदाचा शिधा' साठी तरतूदच नाही

मुंबई : महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या. मात्र, सरकार आल्यानंतर आता शिंदेंकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना या सरकारने बंद केल्या, एकनाथ शिंदेंवर तुमचा एवढा राग का, असे चिमटे विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत काढले.

अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत सहभागी होताना उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार, शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना सरकारवर टीकास्त्र सोडले.

एकनाथ शिंदेंनी चांगल्या योजना आणल्या, पण शिंदेंच्या सगळ्या योजना बंद करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. शिंदेंकडे सरकारचे का दुर्लक्ष आहे, असा सवाल वड्डेटीवार यांनी विचारला. शिंदेंनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्या योजनेत १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले, पण त्याला तुम्ही फाटा दिला. १० हजार महिलांना गुलाबी रिक्षा देणार होता, त्याचा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेत ३ सिलिंडर मोफत देणार होते त्याचा उल्लेख नाही. कोरोना काळात शिवभोजन थाळी आणली होती, ती योजना गरीब माणसाला मदत करणार होती, त्या योजनेचा उल्लेख नाही. महायुती सरकार दिवाळी, दसरा, आंबेडकर जयंतीला आनंदाचा शिधा देत होते, कुठे गेला शिधा? अर्थसंकल्पात तो दिसत नाही. १ रुपयात पीक विमा योजनेचा उल्लेख नाही, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा उल्लेख नाही, ज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थाटन योजनेचाही उल्लेख नाही, अशी यादी वाचत एकनाथ शिंदेंच्या योजना या सरकारला का चालत नाहीत ? असा उपरोधिक सवाल वड्डेटीवार यांनी विचारला.

संत तुकारामांचे अभंग गेले कोठे... 

मागील अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी संत तुकारामांचे अभंग म्हटले होते. यावेळी मात्र तुम्हाला तुकारामांचा विसर पडला. जसे तुम्ही तुकोबांना दूर केले तसेच एकनाथांही दूर करण्याची तुमची योजना दिसते, असा टोला शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी लगावला. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करणार असे तुम्ही वारंवार सांगता, पण त्यासाठी राज्याचा विकासदर १४ ते १५ टक्के इतका आवश्यक आहे. आज अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.३ टक्के इतकाच आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

कशाला शेतकऱ्यांची फसवणूक करता?

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, कर्जमाफीबद्दल एक चकार शब्द अर्थसंकल्पात नाही. शेतकरी सन्मान योजनेत ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, त्याचा उल्लेख कुठे आहे? शेतीच्या पंपाचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली, पण शेतकरी म्हणतात बिल वाढवून येत आहे. मागील बिल भरल्याशिवाय शून्य बिल येणार नाही, असे महावितरणचे अधिकारी सांगतात, कशाला शेतकऱ्यांची फसवणूक करता, असा सवालही आव्हाड यांनी सरकारला विचारला.

निवडणुकीत खूश केले; आता बहिणींसाठी निधी द्या 

निवडणुकीआधी सरकारने  लाडक्या बहिणींना खूश केले. सरकारने सांगितले, आम्ही ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे. म्हणजे १० हजार कोटी मिळणाऱ्या बहिणी घरी जाणार. निवडणुकीआधी २१०० रुपये देऊ असे म्हणालात, त्याचा पत्ता नाही. मुख्यमंत्री म्हणतात पुढे बघू, अजितदादा म्हणतात मी बोललोच नाही, शिंदे म्हणतात मी एकटा काय करू? आता छाननी करत आहात, तुम्ही ५० लाख महिलांना कमी करणार असे दिसते. निवडणुकीत बहिणींना कशाला फसवले, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.
 

Web Title: Government stopped the schemes introduced by Eknath Shinde when he was the Chief Minister Opposition alleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.