पुणे : राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एक प्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून पोलीसच अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असतील, तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी टिकणार, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. (The government tried to save vaze, this is just the beginning said Devendra Fadnavis)
फडणवीस म्हणाले, वाझे यांना वाचविण्यासाठी ‘ते काय ओसामा बिन लादेन आहेत की काय?’ अशी विधाने केली गेली. परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याने त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे होते. त्यामुळेच मला प्राप्त झालेले पुरावे सभागृहात मांडले. एनआयएला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून त्यानुसार कारवाई सुरु केली आहे. आणखी बरीच माहिती समोर येईलच, असे सूचक विधान फडणवीस यांनी केले.
वाझे यांच्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही. कोण कोण यामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांची चौकशी केली जावी. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या काही नेत्यांनी वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा आग्रह धरला होता.
मात्र, मी तज्ज्ञांशी चर्चा केली. वाझे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित असल्याचे मला सांगण्यात आले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचे निमित्त करुन वाझे यांच्यासह काही निलंबित अधिकाऱ्यांना रुजू करुन घेतले. वाझे यांना सेवेत घेण्याची, त्यांना महत्त्वाच्या पदावर नेमण्याची घाई का झाली होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.