Join us

बलात्काऱ्यांना 'शक्ती' देण्याचं काम सरकार करतंय, चित्रा वाघ यांचा संताप

By महेश गलांडे | Published: December 30, 2020 3:29 PM

लातुर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील बलात्काराच्या घटनेत किशन उगाडे हा आरोपी असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यात बलात्काऱ्यांना ”शक्ती” देण्याचं काम सरकार करतयं, ज्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेलं दिसतयं. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ना कि तपास व चौकशीच्या नावाखाली अभय

मुंबई - लातूरमधीलबलात्काराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील अहमदपूर येथे एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या घटनेवरुन भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. तसेच, राज्य सरकार बलात्काऱ्यांना शक्ती देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. 

लातुर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील बलात्काराच्या घटनेत किशन उगाडे हा आरोपी असून पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेऊन वाकी नदीच्या जवळच्या शेतामध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पण, आपला इज्जत लुटल्याने, अपमान झाल्याच्या भावनेतून पीडितेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं गाव हादरलं असून कुटुबीयांनाही मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेची दखल घेत आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. 

राज्यात बलात्काऱ्यांना ”शक्ती” देण्याचं काम सरकार करतयं, ज्यामुळे या विकृतांचे मनोबल वाढलेलं दिसतयं. तक्रार आल्यावर लगेच मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत, ना कि तपास व चौकशीच्या नावाखाली अभय, असे ट्विटर चित्रा वाघ यांनी केलंय. तसेच, रायगडमधील 8 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुनही सरकारला धारेवर धरलंय. समाजात विकृती फोफावतीये पण तिला जेरबंद करायला शासन कमी पडतयं हे नक्की, कायदे आणतयं पण त्याची प्रभावी अंमलबजावणी करतांना मात्र विकृतांना पाठीशी घालायची शासनाची भूमिका , असल्याचा गंभीर आरोपही वाघ यांनी केलाय. 

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूरमधील पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपीची चौकशी करत असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे. 

टॅग्स :बलात्कारलातूरगुन्हेगारीचित्रा वाघभाजपासरकार