तरुणीच्या हत्येनंतर सरकार खडबडून जागे; सुरक्षेचा आढाव्यासाठी सरकारची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 09:03 AM2023-06-08T09:03:21+5:302023-06-08T09:04:15+5:30
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व वसतिगृहांमधील सुरक्षेचा आढावा उच्चशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दक्षिण मुंबईतील चर्नी रोड भागात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीची बलात्कारानंतर हत्या झाल्याच्या घटनेनंतर जाग आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी समिती नियुक्त केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व वसतिगृहांमधील सुरक्षेचा आढावा उच्चशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती घेईल. समितीमध्ये राज्याचे तंत्रशिक्षण संचालक, अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, एलफिस्टन महाविद्यालय, मुंबईच्या सहायक प्राध्यापक डॉ.सोनाली रोडे यांचा समावेश असेल. मुंबईचे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे हे सदस्य सचिव असतील. समिती १४ जूनपर्यंत अहवाल सादर करेल.
सरकार कठोर भूमिका का घेत नाही?
मुंबईत वसतिगृहात मुलीवर अत्याचार होऊन खून होतो, ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे. याबद्दल सरकार कठोर भूमिका का घेत नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
सात दिवसात कसा घेणार आढावा?
समितीला वसतिगृहांचा आढावा घेऊन केवळ सात दिवसात अहवाल देण्यास सांगितले आहे. या सात दिवसात त्यांना वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा संबंधित प्राचार्य, वसतिगृहप्रमुख, वसतिगृह अधीक्षक यांच्यामार्फत आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या उपस्थितीत घेण्यास सांगितले आहे.
चौकशीसाठी समिती
सावित्रीबाई फुले वसतिगृहातील घटनेच्या चौकशीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी समिती नेमली. राष्ट्रीय उच्चशिक्षण प्रकल्पाचे संचालक विनायक निपुण यांची ही एकसदस्यीय समिती असेल. समितीला तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.