भर दुपारी पहाटेचे स्वप्न दाखवणारे सरकार, राज्य दिवाळखोरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:45 AM2018-03-15T04:45:48+5:302018-03-15T04:45:48+5:30
महाराष्ट्र हे प्रगत राज्य असताना आर्थिक शिस्त गुंडाळून ठेवत राज्याची अब्रू देशाच्या वेशीवर टांगण्याचे काम या सरकारने केले आहे. सरकारच्या हातात आणा नसतानाही घोषणा केल्या जात आहेत.
मुंबई : महाराष्ट्र हे प्रगत राज्य असताना आर्थिक शिस्त गुंडाळून ठेवत राज्याची अब्रू देशाच्या वेशीवर टांगण्याचे काम या सरकारने केले आहे. सरकारच्या हातात आणा नसतानाही घोषणा केल्या जात आहेत. भर दुपारी १२ वाजता पहाटेचे स्वप्न कसे पाहावे हे सत्तारूढ पक्षाने करून दाखवले, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.
या वर्षीच्या अर्थसंकल्पात १५ हजारांची तूट दाखवली गेली. आम्ही दोन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या की, गदारोळ केला जायचा. पण या सरकारने पुरवणी मागण्या मांडण्याचा विश्वविक्रम केला आहे. गेल्या चार वर्षांत केलेल्या भूलथापांचे टोक यंदाच्या अर्थसंकल्पात गाठले आहे, असा आरोपही तटकरे यांनी केला.
छिंदम कसा पळून जातो?
छत्रपतींचे नाव घेऊन राज्य चालवतो. छिंदम जाहीरपणे छत्रपतींबद्दल अपशब्द वापरतो. येथे महाराजांबद्दल एखादा शब्द चुकून बाहेर पडला तर विनायक मेटे, अनिल परब अंगावर धावून येतात. मग, छिंदम जिवंत कसा राहतो? कसा पळून जातो? कशाला पुतळे बांधता? छत्रपतींनी देशात लोकशाही राबवली. त्यांना असले पुतळे अभिप्रेत नव्हते. असा एक हजार कोटी खर्च करण्यापेक्षा हे पैसे शेतकऱ्यांना वाटा, असे जयंत पाटील म्हणाले. छिंदमच्या विषयावर मेटे गप्प राहिल्याबद्दल पाटील यांनी सवाल उपस्थित करताच मेटे अत्यंत आक्रमक झाले.