सरकार ८ दिवसांतच अधिवेशन गुंडाळणार, सोमवारपासून विरोधक धारेवर धरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 07:52 AM2018-11-17T07:52:56+5:302018-11-17T07:54:28+5:30
१०० दिवसांसाठी आग्रही सरकार अधिवेशन ८ दिवसांतच गुंडाळणार
अतुल कुलकर्णी
मुंबई : वर्षभरात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन १०० दिवस झाले पाहिजे, हा आग्रह आता केवळ सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणापुरता उरला असून प्रत्यक्षात गेल्या सात वर्षात एकदाही अधिवेशनाने ५१ वा दिवस पाहिलेला नाही. विरोधी पक्षात असताना कायम १०० दिवस अधिवेशनातील कामकाज झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी करणाऱ्या भाजपा-शिवसेना सरकारने केवळ ८ दिवसात हिवाळी अधिवेशन गुंडाळायचे ठरवले आहे.
१९ नोव्हेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता केवळ आठ दिवसच अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. आजवरच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येते; मात्र सरासरी तीनशे तास कामकाज झाल्याचे दिसून येते. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी ३०० तास कामकाज झालेले नाही. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
आजवरच्या अधिवेशनातील कामकाज
हे सरकार कायम पळपुटेपणा करत आहे. विरोधकांकडून उपस्थित होणाºया प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत म्हणून अधिवेशन गुंडाळण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गेल्या तीन वर्षात विरोधकांचा बहिष्कार असताना त्यांनी काम उरकून घेतल्यामुळे काही तास वाढलेले दिसतात.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते,
विधान परिषद
आम्ही संसदीय कामकाज सल्लागार समितीत अधिवेशनाचा कालावधी वाढवा, यासाठी आग्रह धरला होता. पण भाजपाच्या नेत्यांना शेजारील राज्यात प्रचारासाठी जायचे असल्याने त्यांनी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे.
- राधाकृष्ण विखे, विरोधीपक्षनेते, विधानसभा
आमची कायम चर्चेची तयारी आहे. कामकाज शिल्लक राहिले तर अधिवेशनाचा कालावधी वाढवू. मात्र विरोधकांना फक्त गोंधळ घालायचा असतो. गदारोळ करण्यात त्यांना रस आहे. विरोधकांच्या काळात कधीही १०० दिवस अधिवेशन झालेले नाही.
- गिरीष बापट,
संसदीय कार्यमंत्री
वर्ष एकूण दिवस एकूण
अधिवेशने तास-मिनीट
२०१२ तीन ४७ ३४४.५३
२०१३ तीन ४८ ३२२.३०
२०१४ पाच २८ १७१.९४
२०१५ तीन ५१ २८०.६१
२०१६ पाच ५० २६३.९१
२०१७ तीन ४४ १८८.९२
२०१८ दोन ३५ २०६.३७
वर्ष ठिकाण दिवस एकूण
तास
२०१२ नागपूर १० ५३.५३
२०१३ नागपूर १० ६७.३०
२०१४ नागपूर १३ ७६.१७
२०१५ नागपूर १३ ६३.४६
२०१६ नागपूर १० ५१.४०
२०१७ नागपूर १० ५७.३५