लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राजकोट (जि. सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना राज्य सरकारने केली आहे. तसेच, नवीन पुतळा उभारण्यासाठीही समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन्ही समित्यांना तत्काळ अहवाल देण्यास सांगितले आहे.
नवीन पुतळ्यासाठीची संकल्पना, कार्यपद्धती निश्चित करणे हे काम सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. समितीचे सदस्य म्हणून बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, नौदलाचे प्रतिनिधी कमोडोर एम. दोराईबाबू, आयआयटी; मुंबईचे प्रा. जांगीड, प्रा. परिदा, जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे संचालक राजीव मिश्रा, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राजे रघुजी आंग्रे, इतिहासकार जयसिंगराव पवार हे सदस्य आहेत.
धिंगरांच्या अध्यक्षतेखाली समितीपुतळा कोसळल्याची कारणे शोधण्यास समिती स्थापन करण्यात आली असून भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा या समितीचे अध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये सार्वजिनक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकाम) संजय दशपुते, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विकास रामगुडे, आयआयटी; मुंबईचे प्रा. जांगीड, प्रा. परिदा यांचा समावेश आहे.
बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला पहाटेच अटक कोल्हापूर : राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या चबुतऱ्याचे डिझाइन देणारा बांधकाम सल्लागार डॉ. चेतन शंकरराव पाटील (रा. वेताळमाळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला अखेर पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील त्याच्या घरातून पहाटे ताब्यात घेतले. पाच दिवस त्याने पोलिसांना चकवा देत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात एस.टी.तून प्रवास केला. आधारकार्डसह अन्य कागदपत्रे नसल्याने त्याने कुठेही मुक्काम केला नसल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. चेतन पाटील आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा आणि सरकारची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.