Join us

सरकार मराठवाडा वॉटर ग्रीड बंद करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:37 AM

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची विधानसभेत स्पष्ट ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठवाडा वॉटर ग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना अजिबात गुंडाळलेली नाही. ही योजना बंद करण्याचे पाप आमचे सरकार करणार नाही, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली. कोरोनामुळे या योजनेला खीळ बसली असल्याचे त्यांनी मान्य केले.

देवदुताप्रमाणे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड ही मराठवाड्यातील ११ धरणे जलवाहिन्यांनी जोडणारी महत्त्वाकांक्षी योजना आणली होती. मात्र, गेले दीड वर्षे ही योजना बंद आहे. ती गुंडाळली आहे का, असा प्रश्न तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, उदयसिंग राजपूत यांनी उपस्थित केला. मुटकुळे तसेच भाजपचे बबनराव लोणीकर, राणा जगजितसिंह पाटील यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर मंत्री पाटील यांनी सांगितले की, जायकवाडी धरणालगत असलेल्या पैठण, वैजापूर व गंगापूर या तालुक्यातील कामे पहिल्या टप्प्यात घेण्यात येतील. ती लवकरच सुरू झालेली दिसतील. नंतर बीड, लातूरसह टप्प्याटप्प्याने कामे होतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी बैठक घेतली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

५५०० कोटींचा प्रस्ताव nगेल्यावर्षी या योजनेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. पण, काहीच काम झाले नाही. याकडे लोणीकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर, कोरोनामुळे कामे रखडल्याचे गुलाबराव पाटील यांनी मान्य केले. nकेंद्राच्या जलजीवन योजनेतून या प्रकल्पाला मदत मिळावी, यासाठी ५५०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :मराठवाडामुंबई