राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:21 PM2020-07-08T12:21:32+5:302020-07-08T12:22:40+5:30
महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण शांतता ठेवली पाहिजे, राजगृहावर दोन अज्ञातांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि इतर गोष्टी तोडण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घातलं आहे. सर्वच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. या प्रकाराची चौकशी सुरु आहे, अत्यंत चोख काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे सर्व जनतेने शांतता राखावी, राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी आग्रहाची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
विरोधी पक्षानेही यावर भाष्य करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या 'राजगृह' यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मागणी केली आहे. त्यांनी भीमराव (दादासाहेब) आंबेडकर आणि पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा केल्याचंही सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
अभिमानास्पद! भारतात पहिली कोरोना लस तयार करणाऱ्या शेतकरी पुत्राची यशस्वी गाथा
देवेंद्र फडणवीसांचा घणाघात; बाळासाहेबांच्या काळातला ‘सामना’ अन् आताची अवस्था सांगितला फरक
…तर देशाचं राजकारण ठिसूळ पायावर उभं आहे असं समजावं; शिवसेनेचा फडणवीसांना चिमटा
आता २ वर्षात मिळणार एमसीए कोर्सची पदवी; एआयसीटीईचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय