Join us

सरकारने क्रॉस सबसिडी दिल्यास मुंबईकरांनाही मिळणार स्वस्त वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 6:00 AM

मुंबईकरांसाठी लागणारी वीज स्पर्धात्मक पद्धतीने मुंबईबाहेरून आणली, वीज बाहेरून आणण्याच्या मर्यादा कमी केल्या

- सचिन लुंगसे मुंबई : मुंबईकरांसाठी लागणारी वीज स्पर्धात्मक पद्धतीने मुंबईबाहेरून आणली, वीज बाहेरून आणण्याच्या मर्यादा कमी केल्या आणि राज्य सरकारने यासाठी क्रॉस सबसिडी दिली तर निश्चितच दिल्लीकरांप्रमाणेही मुंबईकरांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होईल, अशी आशा वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबई ही आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा समृद्ध असल्याने राज्य सरकार क्रॉस सबसिडी देण्याबाबत सकारात्मक नाही, असेही तज्ज्ञांनी नमूद केले. तर मुंबईमध्ये बेस्ट आणि अदानीची वीज टाटा व महावितरणच्या तुलनेत स्वस्त असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले.वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईमध्ये वीजनिर्मिती आणि वीज वितरण हे दोन्ही खासगी कंपन्यांकडे आहे. तर दिल्लीमध्ये फक्त वीज वितरण खासगी कंपन्यांकडे आहे, तर वीजनिर्मिती ही सरकारकडे आहे. तेथील वीज स्वस्त असण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकार क्रॉस सबसिडी देते. पण मुंबईकरांना सरकार क्रॉस सबसिडी देण्यास तयार नाही. कारण त्यांच्या मताने मुंबईकर आर्थिकदृष्ट्या सक्षम किंवा समृद्ध आहेत; हा एक भाग झाला. दुसरे म्हणजे मुंबईमध्ये बाहेरून वीज आणण्याबाबत खूप मर्यादा अथवा बंधने आहेत. परिणामी मुंबईतच म्हणजे चेंबूर आणि डहाणूला मुंबईकरांसाठी जी वीज निर्माण होत आहे; तीच वीज मुख्यत: वापरावी लागत आहे.परिणामी सरकारने सबसिडी दिली किंवा वीज वाहण्याच्या क्षमतेत वाढ केली; तेव्हा स्पर्धात्मक पद्धतीने वीज बाहेरून येईल. त्यामुळे दिल्लीप्रमाणे मुंबईकरांचे विजेचे दर कमी होण्यास मदत होईल. एकंदर काय तर राज्य सरकारने मनात आणले आणि जर का क्रॉस सबसिडी दिली तर नक्कीच दिल्लीकरांप्रमाणे मुंबईलाही स्वस्त वीज उपलब्ध होईल. (उत्तरार्ध)>दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने पन्नास टक्के सबसिडी दिली आहे, म्हणून तिकडे विजेचे दर स्वस्त आहेत. मुंबई आणि दिल्लीची तुलना करताना वस्तुस्थिती तपासली पाहिजे. मुंबईत एकसमान वीज दर करू, असेही आश्वासन देण्यात आले. पण कोणी काहीच केले नाही. महत्त्वाचे म्हणजे वीज स्वस्त करायची म्हटले तर सबसिडी द्यावी लागेल. इकडे शेतकरी वर्गाला सबसिडी मिळत नाही. मग मुंबईकरांना कशी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. व्यावहारिक प्रश्न लक्षात घेत निर्णय घ्या, पण खोटी आश्वासने देऊ नका. - प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ