मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या कमी झालेल्या सर्व जागा वाढवून घेतल्या जातील, तसेच खुल्या गटातील ज्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदा होऊ शकले नाही, त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या यंदाच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती सरकारतर्फे करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’ चळवळीच्या शिष्टमंडळाला दिले.आर्थिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्याने, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असल्याने अन्य विद्यार्थी, पालकांना नव्या आरक्षणाचा बसणारा फटका अद्याप ध्यानात आलेला नाही. महिनाभरात अन्य अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नव्या आरक्षणामुळे मोठ्या प्रमाणावर खुल्या जागा कमी झाल्याचे लक्षात येईल आणि त्याचा भडका उडेल, अशी भीती व्यक्त करत, सरकारने याबाबत तातडीने लक्ष्य घालून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हितांचे रक्षण करावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. यावर, खुल्या प्रवर्गाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.>राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ६०४ अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता यावे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती सरकार करेल - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:38 AM