मुंबई : मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे (ईडब्लूएस) लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेणार असून याबाबत लवकरच सुधारित आदेश जारी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी दिली. ईडब्लूएसमधून आरक्षण दिल्याने मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येण्याची शक्यता असल्याने समाजातून या निर्णयाला मोठा विरोध होता.
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर भाजप खासदार संभाजीराजे, नरेंद्र पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात ईडब्लूएसच्या सवलती आणि आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ईडब्लूएसचे आरक्षण एका विशिष्ट समाजाला देता येत नाहीत. असे आरक्षण दिल्यास पुन्हा त्यावर न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय, ईडब्लूएसच्या जाचक अटी मराठा समाजाला मान्य नाहीत. मागासवर्ग आयोगाने समाजिक मागासलेपणा सिद्ध केल्याने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे न्यायसंगत असल्याचे संभाजीराजे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.दहा टक्के ईडब्लूएसच्या समावेशामुळे मराठा समाजाच्या मुळ आरक्षणाचा लढा न्यायालयात कमकुवत होण्याची शक्यता मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यांनी याचिका दखल घेऊन हा निर्णय मागे घेण्याबाबत सुधारित आदेश जारी करण्याचे आश्वासन दिल्याचे संभाजीराजे म्हणाले.यावेळी मेगा भरती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही त्यांनी विरोध दर्शविला. तर, ओबीसी आणि मराठा समाजात कसलाच वाद नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लावून आम्हाला आरक्षण नको असल्याचेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांनाही उत्तरमराठा आरक्षणावरूनशरद पवार यांनी संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेला थेट उत्तर देण्याचे संभाजीराजे यांनी टाळले. मात्र, स्वतंत्र भारताच्या इतिहासात संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा मीच उपस्थित केला होता. संसदेच्या आवारातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनही मीच केले. कोणी काही बोलले, तरी समाजासाठी माझे काम करण्याची भूमिका कायम राहील, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.तोपर्यंत आंदोलन सुरूचमुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीनंतर यातील चर्चेची माहिती सह्याद्री अतिथीगृहात सकल मराठा समाजाला दिली. जोपर्यंत मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली.