सरकार 'मिनी मल्टिप्लेक्स' उभारणार, मराठी चित्रपटांना न्याय मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 05:42 PM2020-02-13T17:42:07+5:302020-02-13T17:43:22+5:30
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची
मुंबई - मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत. हे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' (मिनी मिल्टिप्लेक्स) उभारण्यासारखे उपक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावे आणि सध्या मराठीत येत असलेल्या दर्जेदार चित्रपटांना प्रेक्षकांनी गर्दी करावी, यासाठी मिनी मल्टीप्लेक्स ही संकल्पना राबविण्याचा विचार सरकार करत आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. महामंडळाकडून मेघराज राजे भोसले, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे- विज, दिपाली सय्यद, अर्चना नेवरेकर, सुशांत शेलार, चैत्राली डोंगरे, विजय कोचीकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, रत्नकांत जगताप, दिलीप दळवी, महेश मोटकर यावेळी उपस्थित होते.
चित्रपट संमेलनासाठी आर्थिक मदत मिळावी, महामंडळासाठी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी, मराठी चित्रपटांना देण्यात येणारे अनुदान गुणांकन पद्धतीने न करता पुन्हा दर्जा पद्धतीने करण्यात यावे, कलाकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि चित्रपटांना मिळणारे अनुदान ऑनलाईन पद्धतीने मिळावे, पडद्यामागील कलाकारांनाही सांस्कृतिक कार्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, नाट्य-सिनेमा-वाचनालय असे ‘नाट्य-चित्र सांस्कृतिक संकुल’ प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात यावे, मराठी सिनेमांना अधिकाधिक चित्रपटगृहे मिळावीत, असे निवेदन महामंडळामार्फत सांस्कृतिक कार्यमंत्री यांना देण्यात आले.
मंत्री देशमुख यांनी या सर्व निवेदनांचा अभ्यास सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल, असे यावेळी सांगितले. तसेच, मिनी मल्टिप्लेक्स या संकल्पनेबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही ते म्हणाले.