Join us

'पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे भरपाईचा शासन निर्णय लवकरच काढणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 9:21 AM

मुख्यमंत्री ठाकरे यांची ग्वाही; राजू शेट्टी यांच्यासमवेत झाली चर्चा

ठळक मुद्देनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देणे, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठनासंदर्भातील निर्णय  विचाराधीन आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर/मुंबई : सन २०१९ प्रमाणे पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यावर मी ठाम आहे. यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन लवकरच तसा आदेश काढू, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देणे, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठनासंदर्भातील निर्णय  विचाराधीन आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत यंदाच्या महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले. नुकसान झालेल्या सर्व घटकांना भरीव आर्थिक मदत देण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी अशी आक्रोश पदयात्रा काढली. यादरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या निमंत्रणावरून ही बैठक झाली.

बैठकीत शेट्टी म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांची २०१९ च्या धर्तीवर संपूर्ण कर्जमाफी करावी. कृष्णा, वारणा या नद्यांच्या मार्गातील पुलाजवळचा भराव कमी करून कमान पूल बांधावे. पुणे-बंगलोर महामार्गावरील भरावाने पुराचे पाणी कोल्हापूर शहरात येते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा करून भरावाच्या ठिकाणी कमान पूल बांधावे. पूरग्रस्तांचे प्रश्नांवर आयएएस दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा.

टॅग्स :उद्धव ठाकरेराजू शेट्टीपूर