६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, साडेसहा लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या सरकार घेणार

By अतुल कुलकर्णी | Published: July 14, 2020 12:51 AM2020-07-14T00:51:05+5:302020-07-14T00:51:50+5:30

एफडीएने राज्यभरात किती साठा शिल्लक आहे, याची तपासणी मोहीम हाती घेताच सोमवारी दुपारपर्यंत राज्यात २९२१ रेमडेसिवीर आणि ९८१ टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

The government will take 60,000 Remedesivir injections and 6.5 lakh Favipiravir tablets | ६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, साडेसहा लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या सरकार घेणार

६० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन, साडेसहा लाख फॅविपीरावीरच्या गोळ्या सरकार घेणार

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागाने वर्षभरासाठी तब्बल ६० हजार रेमडेसिवीर, २० हजार टॉसिलीझूमॅब इंजेक्शन आणि फॅविपीरावीरच्या ६,८०,००० गोळ््या विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोणालाही या औषधांची गरज लागली तर ते वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दिले जातील. ही माहिती विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
एफडीएने राज्यभरात किती साठा शिल्लक आहे, याची तपासणी मोहीम हाती घेताच सोमवारी दुपारपर्यंत राज्यात २९२१ रेमडेसिवीर आणि ९८१ टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती एफडीए मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली. त्याशिवाय एफडीएने या आठवड्यात २१,५०० इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे सिप्ला आणि हेतेरो कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केले होते, त्यानुसार सोमवारी ४००० रेमडेसिवीर इंजेक्शन राज्यातील खाजगी हॉस्पिटलच्या मेडीकल स्टोअर्समध्ये आले. आता गुरुवारी ४००० इंजेक्शन मिळतील व शनिवार उरलेला साठा उपलब्ध होईल. रोज दिवसातून दोनवेळा स्टॉक घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

इंजेक्शनचा साठा पुरेसा, पण डॉक्टरांचा सल्ला घ्या
रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे, मात्र ही दोन्ही इंजेक्शन रुग्णांना कधी द्यायची हे डॉक्टरना ठरवू द्या, रुग्णांनी परस्पर दबाव टाकून याचा आग्रह धरु नये, असे मुंबई महापालिकेचे सहआयुक्त सुरेश काकाणी म्हणाले.
या इंजेक्शनचा आग्रह रुग्णांच्या नातेवाईकांकडून धरला जात आहे, त्यामुळे खाजगी डॉक्टर्स त्याचे प्रिस्क्रीप्शन लिहून देत आहेत. परिणामी ४५०० रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर बाजारात २० ते ४० हजार या दरम्यान काळ्या बाजारात विकले जात आहे. तर १२ हजार रुपयांना एक असणारे टॉसिलीझूमॅब इंजेक्शन सध्या ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे.
राज्यात ही औषधे पुरेशी उपलब्ध होत आहेत. मंगळवारी दर निश्चित होतील. २० कोटी रुपयांची तरतूद केली असून बुधवारपासून ही इंजेक्शन मिळण्यास सुरुवात होईल, असेही डॉ. लहाने यांनी स्पष्ट केले.

Web Title: The government will take 60,000 Remedesivir injections and 6.5 lakh Favipiravir tablets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.