मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने सविस्तर अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आरक्षणाच्या बाजूने सखोल भूमिका मांडण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लोकमतला दिली. मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंगळवारी सह्याद्री विश्रामगृहात झाली. या बैठकीनंतर चव्हाण यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयात असलेल्या खटल्याचा आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधातील मूळ याचिका आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी राज्य शासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. प्रख्यात विधिज्ञ मुकूल रोहतगी व इतर ज्येष्ठ वकील महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार आहेत. खा. छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली.
मराठा आरक्षणावर सरकार भक्कम बाजू मांडणार - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:17 AM