Join us

ज्वेलरी व हिरे व्यवसायाच्या वृद्धीसाठी सरकार प्रयत्नशील

By admin | Published: March 20, 2017 2:27 AM

ज्वेलरी आणि हिरे हा देशाला मोठे परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही

मुंबई : ज्वेलरी आणि हिरे हा देशाला मोठे परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय असून, त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होते. मुंबई हे या व्यवसायासाठी महत्त्वाचे शहर असून या व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.रत्न तथा आभूषण निर्यात संवर्धन परिषदेतर्फे ४३ व्या इंडिया जेम अ‍ॅण्ड ज्वेलरी पुरस्कार वितरण सोहळ्यात देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या व्यवसायाच्या वृद्धीसाठी मुंबईत प्रदर्शन केंद्र व विद्यापीठ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. शनिवारी हॉटेल ट्रायडंट येथे झालेल्या कार्यक्रमाला परिषदेचे अध्यक्ष प्रवीण शंकर पंड्या, उपाध्यक्ष रसेल महेता, किरीट भन्साळी तसेच लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर व्यावसायिक उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्वेलरी व हिरे व्यवसायाच्या वृद्धीसाठी सरकारचे पूर्ण सहकार्य राहील. त्याचप्रमाणे या व्यवसायातील कामगारांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येईल. जीएसटीबाबत काही अडचणी असल्यास त्यातून निश्चित मार्ग काढला जाईल. रत्न तथा आभूषण निर्यात संवर्धन परिषदेने या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे या क्षेत्रातील नवीन व्यावसायिकांना प्रेरणा मिळेल. व्यावसायिकांनी सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही बाळगली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. वस्तु आणि सेवा कराचा या क्षेत्राला फायदाच होईल; याबाबत प्रामुख्याने विचार करण्यात येईल. हिरे क्षेत्राला काही अडचणी आहेत. मात्र त्या सोडवण्यावर केंद्रासह राज्य भर देत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमुद केले. (प्रतिनिधी)