सरकार गोविंदांच्या पाठीशी; आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली - मुख्यमंत्री
By मनोहर कुंभेजकर | Published: August 19, 2022 05:44 PM2022-08-19T17:44:42+5:302022-08-19T17:45:09+5:30
आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे, असेही ते म्हणाले.
मुंबई - आपल्याला गोविंदाचा आनंद घेता यावा यासाठी राज्य सरकारने आज सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी असून, कालच राज्य सरकारने गोविंदा पथकाचा साहसी खेळांत समावेश केला आहे. तसेच त्यांना विमा संरक्षण, अपघात झाल्यास मोफत उपचार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काळजी घेऊन थर लावा, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या, असा सल्लाही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांना दिला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी 3.58 मिनीटांनी आमदार प्रकाश सुर्वे आणि राज सुर्वे आयोजित मागाठाणे दहिकाला उत्सवात बोरिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या देवीपाडा मैदानात आगमन झाले. यावेळी आमदार सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेही उपस्थित होत्या.
मागाठाणेच्या वन विभागात अनेक आदिवासी पाडे आहेत. येथील आदिवासी पाड्यांतील गरिब मुलांना सकस आहार मिळावा, यासाठी आमदार प्रकाश सुर्वे त्यांना दर महिन्याला प्रोटीन्स बार देणार आहेत. यासाठी येथे लावण्यात आलेली प्रोटीन्स बारची हंडी मुख्यमंत्र्यांनी श्रीफळाने फोडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकाचे स्वागतही
आम्ही 50 जणांनी मुंबई, सुरत, गुवाहटी, अशी यशस्वी हंडी फोडली याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. या राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आहे. आमचे सरकार सर्वसामान्य शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी तसेच गोविंदांचे सरकार आहे.
गणपती उत्सव,नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी सरकारने निर्बध उठवले आहेत. तसेच लागणाऱ्या सर्व परवानग्यादेखिल लवकर घ्याव्यात, असे आदेशही सरकारने दिले आहेत. मात्र अजून कोविड, स्वाईन फ्ल्यूचे संकट गेलेले नाही. यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आपली संस्कृती आणि परंपरा जपून, सर्वांना एकत्र आणून येथे गेली अनेक वर्षे दहीहंडी आणि सर्व सण उत्सव साजरे करणाऱ्या तसेच आपल्या हस्ते प्रोटीन्स बार फोडून आदिवासी मुलांना मोफत प्रोटीन्स बार देणाऱ्या आमदार प्रकाश सुर्वे यांचे त्यांनी अभिनंदन केले. तुमच्या हक्काच्या आमदाराच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी राहावे, असे आवाहनही शिंदे यांनी येथील जनतेला केले.