राजकीय लाभासाठी शासनाचा ‘अनुलोम’, माहिती खाते एनजीओच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:17 AM2018-03-15T05:17:59+5:302018-03-15T05:17:59+5:30

The government's 'Anloam' for political gain | राजकीय लाभासाठी शासनाचा ‘अनुलोम’, माहिती खाते एनजीओच्या दावणीला

राजकीय लाभासाठी शासनाचा ‘अनुलोम’, माहिती खाते एनजीओच्या दावणीला

googlenewsNext

- गणेश देशमुख 
मुंबई : शासकीय योजनांच्या ‘पब्लिसिटी’साठी सरकारकडे माहिती व जनसंपर्क खाते असताना भाजपा सरकारने ‘अनुलोम’ नावाच्या संस्थेला कामाला लावले असून या संस्थेने जनसंपर्क खात्यावर कब्जा केला असल्याची माहिती समोर आली आहे.
‘अनुलोम’ अर्थात ‘अनुगामी लोकराज्य महाभियान’ नावाची ही स्वयंसेवी संस्था अलीकडेच स्थापन झाली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून सरकारने ग्रामपातळीवर विविध विकासकामे हाती घेतली आहेत. या कामांची जबाबदारी या ‘अनुलोम’वर असल्याचे समजते. सरकारविषयी सकारात्मक जनमत तयार करण्याचे काम या संस्थेवर सोपविण्यात आल्याचे समजते.
‘अनुगामी’ या शब्दाचा अर्थ कुणाच्यातरी आचरणाचा अवलंब करणे असा होतो. नावातूनच अर्थ प्रतिबिंबित होत असलेली ही संस्था भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणाचे आचरण करणारी आहे. या ‘अनुलोम’चा मोठा दबदबा माहिती व जनसंपर्क खात्याच्या राज्यभरातील कार्यालयांत दिसून येत आहे. महासंचालक कार्यालयापासून तर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांपर्यंत सर्वत्र ‘अनुलोम’सोबत कालपरवाच बैठकी पार पडल्या. या बैठकीची फारशी वाच्यता होणार नाही याची आवर्जून दक्षता घेण्यात आली.
माहिती खात्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठकांबाबत विचारले असता, ते चमकलेच! काहींचा तर, ‘तुम्हाला कशी माहिती या बैठकींची,’ असा प्रतिप्रश्न होता. माहिती खात्याचे अधिकारी ‘अनुलोम’ आणि त्यासंबंधाने बोलण्यास धजावत नाहीत. लवकरच या संस्थेच्या वतीने मुंबईत ‘महामित्र’ नावाने कार्यक्रम होणार असून, त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे समजते.
>अ‍ॅप, सदस्यनोंदणी, नियंत्रण
या संस्थेने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. सुमारे ८५ हजार युवकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे सदस्यनोंदणी सुरू आहे. माहिती व जनसंपर्क खात्याची यंत्रणा ही सदस्यसंख्या वाढविण्याच्या कामी लागली आहे. ‘अनुलोम’चे पगारी स्वयंसेवक शासनाच्या अधिकाºयांवर याकामी नियंत्रण ठेवून आहेत. अनुलोमच्या विचारांप्रमाणे यंत्रणा राबवित आहे.
अनुलोम ही एनजीओ आहे. शासनाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसारासाठी या संस्थेची मदत होत आहे. त्यामुळे सामान्यजनांना लाभ होईल.
- ब्रिजेश सिंह, महासंचालक माहिती व जनसंपर्क

Web Title: The government's 'Anloam' for political gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.