सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील मुलांना 'जात पडताळणी' प्रमाणपत्राची गरज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:25 PM2019-06-26T13:25:24+5:302019-06-26T13:26:03+5:30
जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गा अंतर्गत आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा व्यवसायिक शाखेत प्रवेश घेताना जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागता होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे, जात पडताळणी प्रमाणपत्राऐवजी ते प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची पावती (टोकन) ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली होती. याबाबत उत्तर देताना, सभागृहातील सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राबाबतच्या विषयावर आग्रहाने मागणी केली होती. मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसह आमच्याकडून बैठक घेण्यात आली आहे. त्यामध्ये, जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशी यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, प्रवेशावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले. दरम्यान, मराठा समाजाच्या लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
SEBC प्रवर्गातील विध्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
विनोद तावडे - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री