Join us

आपला दवाखानाची संख्या सातत्याने वाढविणार, मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे शासनाचा निर्णय

By सीमा महांगडे | Published: December 17, 2023 11:47 PM

मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरु होत असून आपल्‍या दवाखान्‍यांना मुंबईकरांचा उत्‍तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्‍या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेंतर्गत दिली.

मुंबई - स्‍वच्‍छतेच्या पलीकडे जावून मुंबईकरांच्‍या उत्‍तम आरोग्‍यासाठी प्रयत्नांवर भर दिला जात आहे. यासाठी शासनाकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम यापूर्वीच महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु केला आहे. मुंबईत विविध ठिकाणी आपला दवाखाना सुरु होत असून आपल्‍या दवाखान्‍यांना मुंबईकरांचा उत्‍तम प्रतिसाद मिळत असून या दवाखान्यांची संख्‍या सातत्याने वाढवली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंग मोहिमेंतर्गत दिली.‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ मध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कार्यरत दवाखान्यात आतापर्यंत २३ लाखाहून अधिक नागरिकांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार याचा लाभ घेतला आहे, या पैकी पॉलीक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रे येथे साठ हजाराहून अधिक रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचा रोग तज्ञ , नेत्र तज्ञ अशा विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला आहे. यातून मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत महानगरपालिकेने आणलेली ही योजना अतिशय लोकाभिमुख असल्याचे स्पष्ट झाले आहे.सद्यपरिस्थितीतील मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध १९४ ठिकाणी आपला दवाखाने असून  २८ ठिकाणी पॉलीक्लिनिक, तर १६६ ठिकाणी दवाखाने कार्यरत आहेत. यानुसार १९४ ठिकाणी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार उपलब्ध असून आतापर्यंत तब्बल २३ लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी या दवाखान्यांचा लाभ घेतला आहे, अशीही माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे‌. 

 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई