Join us

३२ हजार विद्यार्थ्यांना सरकारची दिवाळी भेट; शिष्यवृत्तीधारकांचे १९ कोटी रुपये वितरित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 9:29 AM

महाराष्ट्रात १९५४-५५ पासून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही योजना राबविण्यात येत आहे.

मुंबई : राज्यात पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या ५० कोटींपैकी १९ कोटी राज्य सरकारकडून मंजूर झाल्याने ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने शिष्यवृत्तीच्या रकमेचे वितरण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे. २०१० ते २०२२ पर्यंत पाचवीला एक हजार व आठवणीतला दीड हजार रुपये दिले जात. यंदापासून ही रक्कम सरसकट ७,५०० रुपये अशी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात १९५४-५५ पासून चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. २०१५ साली शिक्षण हक्क कायद्याला अनुसरून ती इयत्ता पाचवी-आठवीकरिता घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत (पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुढे आठवीपर्यंत आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत) शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती न मिळाल्याने शिष्यवृत्ती वितरणात अडचण येते. म्हणून २०२१ पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्तीधारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी, अशी माहिती योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली. दरम्यान, सरकारच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

२०२३-२४ मध्ये शिष्यवृत्तीसाठी ४९ कोटी ९४ लाख ५० हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी १९ कोटी ३९ लाख १९ हजार रुपये निधी मिळाला आहे. हा सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना सरकारकडून निधी आल्यानंतर शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल.- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :विद्यार्थीमहाराष्ट्र सरकार