महाड : सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या महाड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये पावसाळ्यात असंख्य निसर्गरम्य ठिकाणे असल्याने शहरांतील तरुणाईचे आकर्षण झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील घागरकोंडचा झुलता पूल, मोरझोतचा धबधबा, आंबेनळीचा घाट, कुडपनचा धबधबा, भीमाची काठी, महाड तालुक्यातील मांडले, सव, पाचाड, ढालकाठी येथील धबधबा, कोतुर्डे धरणाचा परिसर, पावसाळ्यातील रायगड दर्शन अशा एक ना अनेक नयनरम्य ठिकाणांनी हा परिसर फुलून गेलेला असल्याने हजारो पर्यटक वरील ठिकाणी पावसात मौज करण्यासाठी आवर्जुन भेट देतात. अशा या पावसाळ्यातील पर्यटनस्थळाकडे शासनाकडून दुर्लक्ष झाल्याने अनेकदा अपघात घडून प्राणहानी देखील होते. महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पर्यटनस्थळे शासनाने विकसीत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर महाड आणि पोलादपूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगावर हिरवा गालीचा पांघरल्याचा भास होतो. काळ, सावित्री, गांधारी या महाड तालुक्यातल्या प्रमुख नद्या कडेकपारीतून खळखळत वाहात जाताना दिसतात. त्यावेळी निसर्गाचे मनोहारी दृष्य पाहाण्यासाठी, कॅमेऱ्यांमध्ये बंद करण्यासाठी हजारो पर्यटक या परिसराला भेट देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून येत आहेत. शहरांतील कॉक्रीट जंगलातील रुक्ष जीवनाच्या पलिकडे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील निसर्गाचे अवखळ रुप पाहाण्याचा आनंद या दिवसांमध्ये शहरांमध्ये राहाणाऱ्यांना मिळतो. मुंबई आणि पुणे जिल्ह्याला जवळचा असलेला रायगड जिल्हा पावसाळ्यातील पर्यटनस्थळासाठी प्रसिध्दीस आला आहे. अशी पर्यटनस्थळे शासनाने विकसित करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.पोलादपूरपासून पंचवीस किलो मीटर अंतरावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्म ठिकाण असलेले उमरठ गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गांव असून या गावापासून एक किलोमीटर अंतरावर मोरझोतचा धबधबा आहे. या ठिकाणी पावसाचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून भेट देतात. धबधबा कोसळण्यास सुरुवात झाल्यानंतर बाहेरगावांहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणिय असली तरी कोणतीही सोय नाही. मोरझोत धबधब्याकडे जाण्यासाठी सोईचा रस्ता नसल्याने लहान वाहने त्या ठिकाणी घेऊन जाणे धोक्याचे असते. नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उमरठ हे ऐतिहासिक स्थळ असून पूर्ण दुर्लक्षित राहीले आहे. गेल्या काही वर्षापासून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी विशेष लक्ष घातल्याने उमरठचा परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
पर्यटनस्थळांकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: July 30, 2014 11:45 PM