Join us

'सामना'तून सरकारचं रेकॉर्डब्रेक कौतुक, जहाल शिवसेनेची भूमिका बनली मवाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 9:40 AM

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याच वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 निर्णय घेण्यात आले.

मुंबई - शिवसेनाभाजपा युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखाची धारही बोथट झाल्याचं पाहायला मिळत आहे. एरवी, म्हणजेच युती होण्यापूर्वी भाजपा, मोदी अन् अमित शहांच्या टीकेने दिवसाची सुरूवात करणाऱ्या जहाल शिवसेनेची भूमिका आता मवाळ झाल्याचं दिसत आहे. कारण, आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाचे रेकॉर्डब्रेक कौतुक केल्याचं दिसत आहे. ‘ब्रेकिंग’ निर्णय; ‘अव्वल’धोरण! या मथळ्याखाली शिवसेनेनं आज सामनातून अग्रलेख लिहिला असून राज्य मंत्रिमंडळाने रेकॉर्डब्रेक निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.  

राज्याचे नवीन उद्योग धोरण सरकारने मंगळवारी जाहीर केले आणि त्याच वेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 22 निर्णय घेण्यात आले. जनहिताचे हे निर्णय असोत किंवा राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविणारे ‘उद्योग धोरण’, त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? विद्यापीठे, महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू करावा ही मागणी होतीच. तिची पूर्तता सरकारने केली आहे. त्याचा लाभ राज्यातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कुटुंबांना मिळणार आहे. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात यावे ही मागणीदेखील जुनीच आहे. लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आग्रह शिवसेनेनेच धरला होता. त्यामुळे हेही काम मार्गी लागण्यात शिवसेनेचा वाटा असल्याचं शिवसेना विसरली नाही. यावरून, नेहमीच भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी अन् शेतकरी, पीडित अन् जनेतेची प्रश्न मांडणारी शिवसेना, आता चक्क सरकारचं कौतुक करताना दिसत आहे.  

राज्यात तब्बल 10 लाख कोटींची गुंतवणूक होत असून सुमारे 40 लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. उच्च तंत्रज्ञानावर आधारित तसेच रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना दिली जाणार आहे. 18 ते 45 वयोगटातील पात्र लोकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय भविष्यातील औद्योगिक जमिनीची गरज लक्षात घेऊन राज्यात ‘लॅण्ड बँक’देखील निर्माण केली जाणार असल्याचे सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाचे ‘रेकॉर्डब्रेक’ निर्णय आणि महाराष्ट्राला पुन्हा ‘नंबर वन’ बनविणारे नवीन उद्योग धोरण याचा फायदा राज्याला आणि जनतेलाच होणार आहे. मात्र, यामुळे विरोधकांना ‘ब्रेक’ लागणार आहे, असे म्हणत शिवसेनेकडून आता सत्ताधाऱ्यांचे रेकॉर्डब्रेक कौतुक करण्याचं काम सुरू झालं आहे. तर, विरोधकांवर टीका करण्यात येत आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना