Join us

शासनाची ५१ लाखांची रॉयल्टी बुडवली

By admin | Published: June 16, 2014 12:01 AM

गौण खनिज माती उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची परवानगी न घेता अवैधपणे तलावातील ३ हजार ६७२ ब्रास मातीचे उत्खनन

भिवंडी : गौण खनिज माती उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची परवानगी न घेता अवैधपणे तलावातील ३ हजार ६७२ ब्रास मातीचे उत्खनन करून शसनाची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी तहसीलदार वैशाली लंभाते यांनी काल्हेर सजाचे तलाठी राजेंद्र निमगुळकर यांच्यामार्फत ५१ लाख ४० हजार ८०० रुपयांची दंडनीय रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची नोटीस कोपर ग्रामपंचायतीस बजावल्याने परिसरात खळबळ माजली आहे.कोपर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे क्र. ६६ क्षेत्र ३-१५-०२ हेक्टर आर या जमिनीत सार्वजनिक तलाव असून या तलावातील गाळ व माती काढण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेऊन ही माती काढण्यासाठी महसूल विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नाही, अशी लेखी तक्रार स्थानिक नागरिकांनी भिवंडी तहसीलदार लंभाते यांच्याकडे केली. त्यानुसार, तहसीलदारांनी चौकशी करण्याचे आदेश काल्हेर तलाठी राजेंद्र निमगुळकर यांना दिले. तलाठ्यांनी चौकशी अहवाल २२ मे २०१४ रोजी तहसीलदारांना सादर केला. तलावातील माती अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी परवानगी, स्वामित्वधनाची चलने व निर्गत पास कार्यालयात सादर करावेत, अन्यथा शासनाची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी कोपर ग्रामपंचायतीने ५१ लाख ४० हजार ८०० रुपये भरावेत, असे लेखी आदेश तहसीलदारांनी बजावले आहेत. या घटनेने कोपर ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनात खळबळ माजली असून पंचायतीने बेकायदेशीर काम केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)