Join us

रद्द बदल्यांतून सरकारचा पोलीस आयुक्तांना इशारा, मातोश्रीवरील भेटीत दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 6:05 AM

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

मुंबई : धडाकेबाज आणि तत्काळ निर्णय घेण्याच्या शैलीमुळे परिचित असलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द करीत राज्य सरकारने त्यांना समज दिली आहे. रविवारी मातोश्रीवरील तासाभराच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना कायदा व नियमांच्या चौकटीत राहून कारभार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतरच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातील, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या अधिकारात गुरुवारी दहा उपायुक्तांचा खांदेपालट करीत त्यांना तत्काळ नवीन पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी एकाही अधिकाºयाचा संबंधित परिमंडळ, अथवा शाखेत दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला नव्हता. कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारने पहिले प्राधान्य त्यावर नियंत्रण आणण्याला दिले. त्यासाठी या वर्षीच्या सर्व विभागांतील सर्वसाधारण बदल्या न करण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे पूर्ण देशाचे लक्ष मुंबईकडे लागले असताना अनपेक्षितपणे उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.या बदल्यांत काहीसे बाजूला केल्याने काही अधिकारी दुखावले. त्यांनी आपल्यावरील अन्याय आघाडीचे शिल्पकार असलेल्या नेत्यापर्यंत पोहोचविला. त्यानंतर शनिवारी दुपारनंतर सर्व सूत्रे हलली. त्यानंतर बदल्या रद्द करण्याच्या सूचना गृहमंत्र्यांना देण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पना देऊन विश्वासात घेण्यात आले. सहआयुक्तांना त्यांच्या स्तरावर आदेश काढून ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याची सूचना मिळाली. त्यानुसार त्यांनी रविवारी सकाळी तसे आदेश लागू केले. 

टॅग्स :महाराष्ट्र सरकारपोलिसबदली