मुंबई : ‘धिस साईट कान्ट बी रिचड्’ ... गेले काही दिवस महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर बरेचदा हेच लिहून येतेय. विशेषत: नवीन सरकारमध्ये या वेबसाईटवर शासनदर्शन दुर्मीळ झाले आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय, शासन निर्णय, नवे कायदे नियम, नव्या कामांच्या निविदा, राज्याचे मंत्री, त्यांच्याकडील खाती आदी विस्तृत माहिती या वेबसाईटवर असते पण गेले काही दिवस ती मिळत नाही. शासन निर्णय (जीआर) हा पत्रकार, कर्मचाऱ्यांपासून अनेकांच्या औत्सुक्याचा विषय. हे जीआर सातत्याने या वेबसाईटवर अपलोड केले जातात पण तेदेखील हल्ली पाहायला मिळत नाहीत.काही जीआर लोकांसमोर येऊ नयेत म्हणून तर यंत्रणा ठप्प पाडली जात नाही ना असा संशयही त्यातून येत आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांची रचना, माहिती, त्यांच्यामार्फत चालविण्यात येणाºया योजना, उपक्रम यांची माहिती एका क्लिकवर या वेबसाईटच्या माध्यमातून मिळते पण ती मिळणेही बंद झाले आहे.असे का घडले या बाबत विचारणा केली असता धक्कादायक माहिती मिळाली. आधी हे काम महाआॅनलाइन या कंपनीमार्फत केले जात होते. अलिकडे ते महाआयटी या कंपनीला देण्यात आले. महाआयटी कंपनी या वेबसाईटची देखभाल करते तर सर्व्हर डेटा सेंटर हे विप्रो कंपनीमार्फत चालविले जाते. महाआयटीच्या सेंटरमध्ये संपर्क साधला असता वेबसाईटचे काम नीट सुरू नसल्याची कबुली देण्यात आली. ती सुरळीत व्हावी यासाठी आमची टीम मेहनत घेत आहे. येत्या एकदोन दिवस सर्वकाही आलबेल असेल, असा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला.
शासनाचे संकेतस्थळच ‘ऑफ’; महिनाभरापासून तांत्रिक बिघाड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 4:47 AM