Join us

समता फाउंडेशनच्या कार्याचे राज्यपालांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समाजसेवा करण्याची संधी ईश्वर सर्वांना देत नाही. समाजसेवेसाठी धन, साधन सामग्री तसेच सर्वांचे सहकार्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : समाजसेवा करण्याची संधी ईश्वर सर्वांना देत नाही. समाजसेवेसाठी धन, साधन सामग्री तसेच सर्वांचे सहकार्य पाहिजे. सेवाकार्यात विघ्नेही अनेक येतात, परंतु अंतिमतः सेवाकर्त्याला आत्मिक शांती आणि समाधान मिळते. अजंता फार्मा तसेच समता फाउंडेशनच्या वतीने राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्यसेवा, कुपोषण मुक्ती, शिक्षण या क्षेत्रांत केले जात असलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समता फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा केली.

समता फाउंडेशनचे विश्वस्त तसेच युगांडा देशाचे मुंबईतील मानद वाणिज्य दूत मधुसूदन अग्रवाल यांचा राज्यपालांच्या हस्ते कोरोना काळातील जनसेवेबद्दल राजभवन येथे बुधवारी सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते झिम्बाब्वेचे मानद वाणिज्य दूत तसेच समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांचाही प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

समता फाउंडेशनच्या वतीने राज्यात आणि विशेषतः आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य, भोजन, मास्क, सॅनिटायझर, औषधे यांचे वाटप करण्यात आले. तसेच आदिवासी मुलांना कॉम्प्युटर प्रशिक्षण देण्यासारखे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती संस्थेचे अधिकारी तानाजी गोंड यांनी दिली. रवी अग्रवाल, रिचा अग्रवाल, दीपक लोया, प्रियंका घुले, विशाल सरिया, आयुष अग्रवाल यांचादेखील या वेळी प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.