ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:12 PM2022-01-21T12:12:42+5:302022-01-21T12:13:09+5:30
दिनकर रायकर यांनी नवनवीन आशय, संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले.
मुंबई: पत्रकारितेच्या क्षेत्रात मुल्यांचे जतन व्हावे आणि आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठी योगदान देणारा संपादक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याचबरोबर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.
इंग्रजी, मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना दिवंगत रायकर यांनी जुन्या आणि नव्या पिढ्यांना सांधणारी मार्गदर्शकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली. त्यामुळे मराठी पत्रकारितेच्या मुल्यांचे जतन आणि जगभरातील आधुनिक प्रवाह रूजावेत यासाठीचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. नवनवीन आशय, संकल्पना, विषयांची मांडणी यासाठी त्यांनी होतकरू तरुणांना संधी दिली. यामुळे पत्रकारितेत एक नवी प्रयोगशील पिढी उभी राहिली, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले.
दिनकर रायकर हे अभ्यासू, साक्षेपी व संयत पत्रकार व संपादक होते. पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करताना रायकर यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. संपादक म्हणून वाचकांचे प्रबोधन करताना त्यांनी टोकाच्या भूमिका घेतल्या नाही. राज्यातील अनेक पत्रकारांच्या जडणघडणीत त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या माध्यम जगतातील एका व्यासंगी पत्रकार - संपादकाला तसेच समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या मनमिळावू व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.