जनसामान्यांचा कैवारी गेला - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:05 AM2021-04-29T04:05:27+5:302021-04-29T04:05:27+5:30

एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे तसेच राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मितभाषी असलेले ...

Governor Bhagat Singh Koshyari is the hero of the masses | जनसामान्यांचा कैवारी गेला - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

जनसामान्यांचा कैवारी गेला - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next

एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेचे तसेच राज्य विधानसभेचे सदस्य म्हणून मुंबईच्या आणि विशेषतः धारावीच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला आहे.

- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

* दोन पिढ्यांचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील. धारावी आणि मुंबईतील जनमानसाशी जोडून घेऊन त्यांनी विधिमंडळात आणि संसदेतही उत्कृष्ट काम केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. लोकाभिमुख विकासकामांना चालना देताना त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचे मार्गदर्शक नेतृत्व हरपले

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचे निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कन्या आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य कुटुंबीय यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हक्काचा माणूस काळाच्या पडद्याआड गेला

एकनाथ गायकवाड मूळचे सातारा जिल्ह्याचे. व्यवसायानिमित्त ते मुंबईत आले. धारावीसारख्या भागात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला.

- बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री

निष्ठावान व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले!

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे निष्ठावान, अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तरुण वयात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे एकनाथ गायकवाड शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. दलित चळवळीतही ते सक्रिय होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व गमावले आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा हरपला!

ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. आयुष्यभर त्यांनी काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार तेवत ठेवला. राजकारणात अनेक चढ-उतार सोसले; पण कधीही आपल्या तत्त्वांचा त्याग केला नाही. युवक काँग्रेसपासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आमदार, मंत्री, खासदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष अशी बहरत गेली. अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण आपली साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. त्यामुळेच प्रदीर्घ काळ आमदार व खासदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपवली होती.

- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज हरपला

एकनाथ गायकवाड यांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे ते निष्ठावंत नेतृत्व होते. काँग्रेसच्या विचारधारेशी आजीवन प्रामाणिक राहणाऱ्या गायकवाड यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.

- अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

सर्वसमावेशक आणि अनुभवी नेतृत्व हरपले

कार्यकुशल असलेले एकनाथ गायकवाड हे कुशल संघटक देखील होते. साधे राहणीमान असलेल्या गायकवाड यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या निधनाने काँग्रेसच नाही तर सामाजिक चळवळीचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

- छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

जनसामान्यांचा कैवारी गेला

एकनाथ गायकवाड यांच्या निधनाने जनसामान्यांचा कैवारी आपल्यातून निघून गेला आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आलेल्या एकनाथ गायकवाड यांनी आमदार म्हणून मुंबईतील धारावी मतदार संघात उत्तम काम केले. दांडगा लोकसंपर्क आणि दीनदलितांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जात. बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे ते गाढे अभ्यासक होते.

- राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री

मुंबई काँग्रेसचे खूप मोठे नुकसान

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे अत्यंत निष्ठावान, अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व आज हरपले आहे. काँग्रेस पक्षाचे विशेषतः मुंबई काँग्रेसचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. गेली ४५ वर्षे ते एकनिष्ठपणे व प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षासाठी काम करत होते. काँग्रेस पक्षाने कोणतीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की ते यशस्वीपणे पार पाडत होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबईकरांच्या अनेक समस्या व अडचणी सोडविण्यासाठी खूप मोलाचे काम केले.

- भाई जगताप, अध्यक्ष मुंबई काँग्रेस

----------------

Web Title: Governor Bhagat Singh Koshyari is the hero of the masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.