मुंबई: गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. मात्र, यातच आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चक्क ठाकरे सरकारचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. राज्याने प्रगती व विकासात कुठेही खंड पडू दिला नाही, या शब्दांत राज्यपालांनी सरकारचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
कोरोना संकट काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरवली. कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. राज्यातल्या ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या Export Preparedness Index मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे याबाबत आनंद व्यक्त करून केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल- 2021’ मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण
इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील ४३ अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार आहेत, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रूपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ अंदाजे २० लाख शेतकऱ्यांना होणार आहे. विकेल ते पिकेल अभियानात शेतकऱ्यांचे विविध गट स्थापन केले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. सध्या राज्यात १ हजार ५४९ शिवभोजन केंद्रे सुरू असून ९ कोटी १८ लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.