मनोहर कुंभेजकर
मुंबई - आपल्या लाल दिव्याच्या गाडीने प्रवास करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चक्क वेसावे-मढ जेट्टी-वेसावे असा बोटीने प्रवासाचा त्यांनी आनंद लुटला. पश्चिम उपनगरात वेसावे ते मढ जेट्टी अशी तर सेवा चालते. मालाड मार्गे मढ जेट्टीवर वाहनाने येण्यासाठी किमान एक तास लागतो. मात्र वेसावे ते पलीकडच्या तीरावर असलेले मढ जेट्टी असे तर सेवेने सदर अंतर चार पाच मिनिटांत पार होते. राज्यपालांच्या मढ येथील भेटीचे निमित्त होते ते लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोपाचे. आज सकाळी राज्यपाल वेसावे बंदरावर आले. त्यांनी मांडवी गल्ली कोळी जमातीच्या आरामदायी बोटीने पलीकडे असलेल्या मढ जेट्टीवर आले आणि कार्यक्रम संपल्यावर परत येतांना त्यांनी मढ जेट्टी-वेसावे असा तर सेवेने त्यांनी प्रवास केला. या फेरीबीटीचे मार्गदर्शक प्रवीण भावे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राज्यपाल सकाळी १०.४५ मिनिटांनी वेसावे बंदरावर आले.त्यांनी वेसावे ते मढ जेट्टी असा कार्यक्रमाला जातांना बोटीने प्रवास केला आणि परत दुपारी १२.१५ ला त्यांनी मढ जेट्टी ते वेसावे असा बोटीने प्रवास केला.तसेच वेसावे वरून मढला जाणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बोलवून त्यांनी फोटो देखील काढले अशी माहिती त्यांनी दिली.
वाहतूक कोंडी झाली दूर तर रस्ते झाले चकाचक
वेसावे कोळीवाडयात रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीची मोठी समस्या आहे. मात्र आज राज्यपाल येथे आल्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने काढण्यात आली आणि पालिका प्रशासनाने वेसावे गावात स्वच्छता करून येथील रस्ते चकाचक केले अशी माहिती प्रवीण भावे यांनी लोकमतला दिली.राज्यपाल आल्याने काही काळ का होईना येथील वाहतूक कोंडी झाली दूर तर रस्ते झाले चकाचक झाले अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आमच्या कोळी बांधवांच्या समस्या सोडवा
राज्यपाल मढला गेले आहे याची माहिती वेसावकरांना मिळाली.येतांना आम्ही त्यांच्या गाडीजवळ जात त्यांची भेट घेतली अशी माहिती मरोळ बाजार मासळी विक्रेता संस्थेच्या अध्यक्ष राजेश्री भानजी यांनी लोकमतला दिली. आमच्या कोळी बांधवांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी मांडून सुटत नसल्याने आम्ही चिडलो असल्याची कैफियत मी राज्यपालांकडे मांडली. येथील सुमद्राचे पाणी काळेभोर झाले असून वेसावे खाडीतील गाळ काढला जात नसल्याने आमच्या बोटी गाळत रुतून आमचे नुकसान होते असे त्यांच्या निदर्शनास आणल्याचे त्यांनी सांगितले.आमच्या कोळी बांधवांच्या समस्या सोडवा असे त्यांना साकडे घातल्याचे राजेश्री भानजी यांनी सांगितले.