झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी आता थेट राज्यपालांचा पुढाकार; राजभवनात तब्बल सव्वा तास चालली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 06:35 PM2021-10-26T18:35:50+5:302021-10-26T18:37:31+5:30
राज्यपालांनी सुमारे सव्वा तास खा. शेट्टी यांच्या समवेत आणि महाआघाडी सरकारचे प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत राजभवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते.
मनोहर कुंभेजकर -
मुंबई- झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. आता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी पुढाकार घेतला आहे. राज्यपालांनी सुमारे सव्वा तास खा. शेट्टी यांच्या समवेत आणि महाआघाडी सरकारचे प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत राजभवनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. (Slum free Mumbai)
या बैठकीत गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिगिकर, गृहनिर्माण विभागाचे सहसचिव तुंभारे, आणि अन्य गृहनिर्माण विभाग आणि एसआरएचे अधिकारी, मुंबई भाजप सचिव डॉ. योगेश दुबे, युनूस खान आदी उपस्थित होते.
गोरगरीबांच्या हक्कासाठी खा. गोपाळ शेट्टी यांचे प्रयत्न अतिशय स्तुत्य असल्याचे सांगून यासंदर्भात उपस्थित एसआरए , म्हाडा अधिकाऱ्यांना एसआरए पुनर्वसनाच्या रेंगाळलेल्या निर्णय प्रक्रियेबद्दल राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एसआरए योजना गतिमान व्हावी आणि रेंगाळलेले प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समोर झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न मांडले. आणि रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण व्हावे म्हणून झोपडपट्टी पुनर्वसना संबंधी पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २०११ पर्यंतच्या झोपडपट्टी वासीयांना घर मिळावे व जीआर अनुसार हक्काचे पक्के घर लवकरात लवकर देण्यात यावे तसेच पहिल्या मजल्यावरील झोपडपट्टीवासीयांना घर द्यावे अशी विनंती केली.
वारंवार पाठपुरावा करून समित्या ही नेमल्या गेला परंतु त्या नंतर पुन्हा एक नाही तर दुसरा कारणास्तव हा विषय रखडले आहे. आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत झोपडपट्टी वाढत गेली आहे. याशिवाय पहिला माळ्यावर असलेल्या झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसन वेळी सशुल्क आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ठराविक रक्कम भरून हक्काचे घर देण्यात यावे, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या बैठकीत झोपडपट्टी विषय समाविष्ट केला असून खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांना धन्यवाद दिले आहे.
झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी आता राज्यपालांचा पुढाकार#bhagatsinghkoshyaripic.twitter.com/sdJQRWcU0Q
— Lokmat (@MiLOKMAT) October 26, 2021
राज्यपालांनी यासंदर्भात आश्चर्य व्यक्त करून इतके वर्ष झोपडपट्टीवासीयांना घर देण्याकरिता विलंब का होत आहे, असा सवाल या बैठकीत केला. मालाड पश्र्चिम भागात मालवणी येथील तक्षशिला एसआरए इमारतीतील ४० रहिवाशांना ४ वर्षांपासून ४० घरे तयार असूनही आजपर्यंत ती मिळाली नसल्याबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एसआरएच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वतः जाऊन लोकांना घर देऊन समस्येतून मुक्तता द्यावी, असे राज्यपाल महोदयांनी सांगितले.
गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले की, पहिला माळ्यावर चाळीस वर्षांपासून राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी इतके वर्ष वाट बघावी का लागते याबद्धल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच २००० ते २०११ पर्यंत सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून योजना लागू करण्यात आली असून बहुचर्चित पहिल्या माळ्यावर राहणाऱ्यांना झोपडपट्टीवासीयांना बेघर करणे, हे मानवी वेदना देणारे आहे अशा शब्दात राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.