मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच विविध क्षेत्रामधून राज्यापालांच्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या त्या विधानाबाबत परखड भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चुकींच आहे. तसेच मी त्याच्याशी सहमत नाही असे, आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आशिष शेलार म्हणाले की, मी राज्यपालांच्या विधानाशी १०० टक्के असहमत आहे. हेतू असो वा नसो, राज्यपालांच्या या विधानाशी मी संपूर्ण असहमत आहे. हे विधान साफ चुकीचं आहे. हे विधान बरोबर नव्हे. देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामधून त्यांनीही राज्यपालांच्या विधानाशी संपूर्ण असहमती दर्शवली आहे, असेही आशिष शेलार यांनी सांगितले.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महराजांशी केली होती. तेव्हा कोश्यारी म्हणाले होते की,
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील. राज्यपालांच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण निर्माण झाला आहे. तसेच त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.