सोनू सूदच्या कामानं राज्यपाल कोश्यारीही इम्प्रेस, थेट फोन करुन कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 04:10 PM2020-05-28T16:10:32+5:302020-05-28T16:12:54+5:30
सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनच्या काळात ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांची तो मदत करतोय. या मजुरांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी सोनूचे अथक प्रयत्न सुरु आहेत. सोनू सूदच्या या कामाचं सोशल मीडियातून आणि दिग्गजाकडून कौतुक होत आहे. बॉलिूवड अभनेत्यांपासून ते क्रिकेटर्संपर्यत सर्वच सोनूचं कौतुक करत आहेत. आता, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सोनूच्या कामाचं कौतुक केलं आहे.
सोनूने आत्तापर्यंत १२ हजार मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचं काम केलं आहे. तर, उर्वरीत मजुरांसाठी नुकताच एक हेल्पलाइन नंबर देखील सोनूने जारी केला होता. गावी जाण्यास इच्छूक असलेले मजूर मदतीसाठी या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात, असें आवाहन सोनू आणि त्याच्या टीमकडून करण्यात आले होते. तूर्तास सोनू करत असलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पण सोनू मात्र आतून काहीसा अस्वस्थ आहे. याच अस्वस्थतेपोटी त्याने स्थलांतरीत मजुरांची माफी मागितली आहे. सोनूने त्याच्या मोबाइलवर येणा-या मॅसेजेसचा एक व्हिडीयो शेअर केला. ‘तुमचे मॅसेज आमच्यापर्यंत वेगाने पोहोचत आहेत. तुम्हा सर्वांपर्यंत मदत पोहोचवण्याचे माझे व माझ्या टीमचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत़. मात्र या दरम्यान आम्ही काही मॅसेज वाचू शकलो नसू तर त्याकरता मला क्षमा करा’,असे सोनू म्हणतोय.
सोनूचं हे मदतीचं काम दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्यामुळेच राजकारणी, अभिनेते व क्रिकेटर्संनेही सोनूचे कौतुक केलंय. आता, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी थेट कॉल करुनच सोनूच्या कामाचं कौतुक केलंय. परराज्यात मजुरांना पाठविण्याच्या समर्पित कामाचं कौतुक असल्याचं कोश्यारी यांनी म्हटलंय. कोश्यारी यांच्या मेसेजला रिप्लाय देत, सोनूनेही सर, आपल्या शब्दामुळे काम करण्यास आणखी प्रेरणा मिळाल्याचं म्हटलंय. तसेच, स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचं हे काम निरंतर सुरुच राहिले, असे म्हणत हा सन्मानच असल्याचं सोनूने ट्विटरर अकाऊंटवरुन म्हटले ाहे.
Thank u so much sir. Your words inspire me to work harder. Will continue working for the migrant brothers and sisters till we unite them with their families 🙏 Honoured. https://t.co/fmZjfCfAqH
— sonu sood (@SonuSood) May 27, 2020
दरम्यान, आपल्या अभिनयातून खलनायक म्हणून पुढे आलेला सोनू सूद आता रियल लाईफमध्ये हिरो बनला आहे. लाखो-कोट्यवधी भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, सोनूला आता व्हिलन बनून पडद्यावर पाहणे अवघड असल्याचंही अनेकांनी म्हटलंय.