Join us

तौक्ते चक्रीवादळातील बहाद्दरांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने मे महिन्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर भीषण परिस्थिती निर्माण केली होती. या वादळाच्या तडाख्याने मुंबईलगतच्या समुद्रातील ...

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने मे महिन्यात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर भीषण परिस्थिती निर्माण केली होती. या वादळाच्या तडाख्याने मुंबईलगतच्या समुद्रातील बॉम्बे हाय परिसरात पी-३६५ या तराफ्यावरील शेकडो कर्मचाऱ्यांचे प्राण धोक्यात आले होते. या आपत्तीच्या प्रसंगात नौदलाच्या बचाव पथकाने अभूतपूर्व कामगिरी बजावली. प्रतिकूल परिस्थितीत लोकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राजभवन येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

तौक्ते चक्रीवादळात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएन तलवार, आयएनएस कोलकाता या युद्धनौका आघाडीवर होत्या. नौदल आणि तटरक्षक दलाच्या बचाव पथकाने १७७ जणांची सुखरूप सुटका केली होती. आयएनएस कोची जहाजाचे कमान अधिकारी कॅप्टन सचिन सिक्वेरा व आयएनएस कोलकाताचे कमान अधिकारी कॅप्टन प्रशांत हांडू यांच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या चमूने अतिशय विपरीत परिस्थितीत शेकडो लोकांचे प्राण वाचविले होते. उभय अधिकाऱ्यांनी यावेळी दुर्घटनेचे कथन केले. राज्यपालांनी अधिकाऱ्यांच्या शौर्याचे कौतुक करीत नौदलाच्या सर्व जवानांना शाबासकी दिली. आयएनएस तलवारचे कमान अधिकारी कॅप्टन पार्थ भट्ट जहाजावर कर्तव्य बजावत असल्याने राज्यपालांना भेटण्यास येऊ शकले नाहीत.