Join us

अहिंसा आणि अध्यात्म संशोधन संस्थेचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 2:20 AM

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजभवन येथे आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेचा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राजभवन येथे आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेचा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. विरार येथील तुलसी महाप्रग्या भारती ट्रस्टच्या पुढाकाराने या संशोधन संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. योग ही मन आणि आत्मा यांना एकात्म करणारी जीवन पद्धती आहे. मन:शांती, आत्मिक शांती आणि आत्म-संयम विकसित करणे हे योगाचे अंतिम उद्दिष्ट आहे. आज मानवी समाज हिंसा, तणाव, क्रूरता, लोभ, भ्रष्टाचार, निराशा, शारीरिक व्याधी आदींसारख्या समस्यांना तोंड देत आहे. हे पाहता विश्वाला आध्यात्मिक शिकवण देण्याची गरज आहे.व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर शांती हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. मानवतेच्या अंगाने समाजातील आपले स्थान उंचावण्यासाठी आपल्यात सकारात्मक बदल करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने या संशोधन संस्थेची स्थापना अत्यंत कालसुसंगत आहे. मुनी महेंद्रकुमारजी हे मानवतेच्या भल्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माचा मिलाफ करणारे अध्यात्मवादी व्यक्तिमत्त्व आहे, असे गौरवोद्गारही राव यांनी काढले.